दिल्लीतला चांदनी ( मराठीत चांदणी म्हटलं जात असलं तरी पुण्यातला चांदणी चौक आणि दिल्लीतला चांदनी चौक यांची तुलना होऊ शकत नाही बरं ) चौक प्रसिद्धच आहे. गेल्या काही वर्षात इंटरनेट सगळ्यांना इतक्या सहज मिळालेलं आहे की त्याचा परिणाम म्हणून सगळेच जण सगळ्याच गोष्टी एकमेकांशी, जगाशी शेअर करायला लागले आहेत. मी पण अशाच प्रकारे चांदनी चौकातल्या परांठेंवाली गलीबद्दल वाचलं होतं, पाहिलं होतं. त्यामुळे दिल्लीला मुक्काम हलल्यावर इथे जाणं माझ्या विशलिस्टवर अर्थातच होतं. दिल्लीतल्या करपवून टाकणाऱ्या उन्हाळ्यात इथे पाऊल टाकण्याचं धाडस मी केलं. पण त्याचा मला बिलकुल पश्चात्ताप झाला नाही. कितीही कष्ट करून इथे पोहोचावं लागलं तरी खवय्या लोकांनी ही गली चुकवू नये. दिल्ली मेट्रोच्या कृपेने तुम्ही चांदनी चौक ह्या मेट्रो स्टेशनवर उतरायचं आणि स्टेशन मधून बाहेर पडण्यापूर्वीच आपल्याला बोर्ड दिसेल ज्यावरून स्टेशनच्या कुठच्या बाजूला बाहेर पडायचं हे पण कळेल. मेट्रोच्या थंड,चकचकीत वातावरणातून बाहेर आलात की चांदनी चौकातली Method In Madness तुमच्यासमोर वहात असते. स्टेशनपासून ५ ते १० मिनिटात चालत तुम्ही परांठेंवाली गलीपर्यंत पोचू शकता. तिथे पोचेपर्यंत तुम्हाला रस्त्यावरून आडव्या तिडव्या धावणाऱ्या गाड्या, इ रिक्षा (म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा) , ओझी घेऊन पळणाऱ्या हातगाडया , डोक्यावरून ओझी वाहणारे मजूर,खरेदीला आलेली माणसं , जवळच्या गुरूदवाराला भेट देणारी भक्त मंडळी आणि आपल्यासारखी टूरिस्ट मंडळी यांचा सगळ्यांचा सामना करत परांठेंवाली गलीपर्यंत पोचावं लागतं .
कुठच्याही मोठ्या शहराच्या जुन्या भागात असतात तसा हा अरुंद, मॉडर्न स्टँडर्ड्सनी अस्वच्छ असा रस्ता आहे. इथे भटक्या कुत्र्यान्पासुन ते परांठेंवाली गलीचा अनुभव घ्यायला आलेले परीटघडीचे लोक सगळेच सुखाने आणि समाधानाने फिरत असतात. इथली काही दुकानं ही ५-६ पिढयांपासून चालत आलेली आहेत. आता सोशल मीडियामुळे या गलीला नव्याने ग्लॅमर मिळालेलं असलं तरी ही गली कुठचाही देखावा करण्याच्या फंदात अजूनही पडलेली नाही. बदलत्या काळानुसार इथे टिश्यू पेपर हात पुसायला मिळतात किंवा बाटलीबंद प्यायचं पाणीसुद्धा मिळतं पण प्लास्टिकचे हातमोजे घालून इथे पराठे लाटले जात नाहीत. इथले पदार्थ स्लिंग लावून झाकलेले वगैरे नसतात. पराठा तुमच्या ताटलीत कृत्रिम अदबीने वाढला जात नाही. आपण पराठा खायला जातो आदरातिथ्य अनुभवायला नाही.
मराठी लोकांना पराठा तसा कमीच माहिती. क्वचित आपल्या घरांमधून मेथीचे, पालकाचे,बटाट्याचे पराठे होतात आजकाल पण ते मेथीची पोळी किंवा पालकाची पोळी म्हणावे असे असतात. पराठा शब्दातला दमदारपणा अनुभवायचा असेल तर परांठेंवाली गली गाठली पाहिजे. इथे भेंडीच्या पराठ्यापासून ते सुक्या मेव्याच्या पराठ्यापर्यंत अनेक प्रकारचे पराठे मिळतात. भेंडी या पुचाट भाजीच्या चाहत्यांनी लक्षात ठेवा की भेंडीला इथे ओक्रा म्हणतात . आता हा शब्द वाचून कोणाला मळमळल असेल तर इतर अनेक इंटरेस्टिंग पराठयांवर लक्ष केंद्रित करा. डाळ पराठा , मिक्स भाज्यांचा पराठा , पुदिना पराठा, बटाटा पराठा, टोमॅटो पराठा, सुका मेवा पराठा अशी बरीच व्हरायटी इथे मिळते . खुर्चन असाही एक वेगळा शब्द तुम्हाला मेनू वर वाचायला मिळेल . हा पराठा मलाई किंवा साय घालून केलेला असतो. ह्या पराठयांचा आकार आणि जाडी दोन्ही पांढरपेशा जिभेला आणि पोटाला झेपेल असा असतो. त्यामुळे जर तुम्ही ग्रूपमध्ये गेलात तर बऱ्याच प्रकारचे पराठे मागवू शकता आणि प्रत्येकाला प्रत्येक पराठ्याची चव बघता येऊ शकते. इथले पराठे भाजलेले नसतात . ते छोट्याशा कढईत तळले जातात खरपूस होईपर्यंत . तळण्याची कला जबरदस्त आहे इथली. पराठा समोर येतो तेव्हा तेलकटपणाचा मागमूसही नसतो. त्याच्यामागचं विज्ञान मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. इथे पराठे तळण्यासाठी वापरतात ती नेहेमीसारखी खोल कढई नाही . पण भाजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तव्यांसारखी उथळ पण नाही . तळल्यामुळे पराठ्याचा वरचा भाग खरपूस होतो आणि पराठ्याचा आतला भाग वाफेवर शिजतो. हे तवे कम कढई जाड बुडाची असल्यामुळे पराठा जास्त तेल खात नाही.
पराठा टेबलावर अवतरण्यापूर्वी त्याचे सगळे साथीदार एकत्रच तुमच्या भेटीला येतात. प्रत्येक दुकानांनुसार पराठयांचे साथीदार थोडेफार बदलतात. पण आंबट गोड चिंचेची चटणी , हिरव्या मिरचीची झणझणीत चटणी , बटाटा हा प्राण असणारी आणि नावापुरते मटार टोमॅटो असणारी रसभाजी येतेच पराठ्याबरोबर चाखण्यासाठी . मला तर आपल्या लाल भोपळ्याची झणझणीत भाजी पण खायला मिळाली . लाल भोपळा सुद्धा इतका चटकदार होऊ शकतो हे मला नव्यानेच कळलं इथे.माझ्या ताटात आलेल्या चिंचेच्या आंबट गोड चटणीत एक पिवळसर तुकडा तरंगत होता. आधी मला तो अमूल बटरचा तुकडा आहे असंच वाटलं पण चमच्याने आणि जिभेने थोडं अधिक संशोधन केल्यावर कळलं की ते साधारण पिकलेल्या केळ्याचे तुकडे आहेत.
परांठेंवाली गल्लीतल्या एका दुकानात बसून पराठ्याचा तुकडा मोडताना मला दिसत असतात गल्लीत सगळीकडे वर एकमेकात गुंतलेल्या विजेच्या तारा, एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर सहज उड्या मारणारी एक दोन माकडं, रस्त्यावर पहुडलेले- भटकणारे कुत्रे , कामगारांची लगबग. या सगळ्याकडे तटस्थपणे मी पाहात असताना माझया १२ वर्षांच्या, कायम शहरात वाढलेल्या मुलीचं वाक्य माझ्या कानावर आदळत , काय ह्या हॉटेलची साफसफाई सुद्धा होत नाही का रोज? थोडं रिनोव्हेशन करायला पाहिजे यांनी , किती अस्वच्छ आहे सगळं. मला अचानकच जाणवलं की ही परांठेंवाली गली एका वेगळ्या काळातली आहे. माझ्या पिढीला कदाचित त्या काळाशी अजूनही जुळवून घेता येतंय पण माझ्या मुलीच्या पिढीला बिलकुलच नाही. तिच्यासाठी या देशी चवीपेक्षा आणि देशी अनुभवापेक्षा स्वच्छ,नीटनेटकं, मॉडर्न असं जग रेलेव्हन्ट आहे. ती कदाचित आपल्या आईवडिलांची इछा आहे म्हणून इथे आली असेल पण मनातल्या मनात कधी एकदा इथून निघतो आणि एखाद्या वातानुकूलित टापटीप हॉटेलात जातो अस वाटत असेल तिला . उत्साही आणि हटके असे पर्यटक इथे येत असतील पण त्यांची संख्या किती असेल? इथला बिझनेस चालू ठेवण्याइतकी असेल का? या परांठेंवाली गलीने आपलं सध्याचं रूप बदलायचं म्हटलं तर ते आर्थिकदृष्ट्या त्यांना शक्य आहे का? बहुदा नाही. आणि त्यातूनही समजा त्यांनी हे रूप बदललं तर इथल्या पराठ्याना आज जे देशी अपील आहे ते तसंच राहील का? अत्ता या पराठ्याना जी साधी आणि अकृत्रिम चव आहे ती तशीच राहील का? इथे माझ्यासारखे परीटघडीचे लोक पराठे खायला येतात तेव्हा त्यांच्या मनाला एक सैलपणा येतो तो त्या टापटीप हॉटेलात पराठा खाताना येईल का? याही सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशीच आहेत . काळाच्या रेट्यात परांठेंवाली गली कात टाकते आणि नवीन रूप धारण करते की लुप्त होऊन जाते ह्याचं उत्तर आज कोणाकडेच नाही.









Chan!! As usual:)
ReplyDeleteहा अनुभव घेतलाच पाहिजे
ReplyDeleteअप्रतिम सुप्रिया आणि तुझ्या खास अशा खुमासदार शैलीत लिहिले आहेस त्यामुळे वाचल्यावर पराठे खालल्याचा आनंद झाला व तृप्ततेचा ढेकर दिला ..
ReplyDelete