Saturday, 31 May 2025

अनवट पर्यटन- दागशाई

 एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  पर्यटकांच्या लिस्टमध्ये हमखास असणार अशी ठिकाणं. पण मोठा विकेंड म्हटला कि हि सगळी पर्यटनस्थळं ओसंडून वाहतात आणि आयत्या वेळी अशा ठिकाणी जाणं शक्यच नसतं. मग एखाद्या अनवट ठिकाणाचा शोध घ्यावासा वाटतो. असं अनवट ठिकाण एकदा आम्हाला आमच्या एका मित्राने सुचवलं. "दागशाई " मला तर ऐकूनही हे ठिकाण माहीत नव्हतं . मित्र आणि गुगल ह्यांच्या मदतीने हे कळलं कि दिल्ली शिमला रस्त्यावर शिमल्याच्या आधी साधारण ६०/६५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. हि  जुन्या कॅंटोन्मेंट पैकी एक कॅंटोन्मेंट आहे. 



दिल्लीवरून गाडी चालवत दागशाई ला जायचं आम्ही ठरवलं. साधारण सहा तासात होऊ शकणारा प्रवास. चंडीगढ ओलांडलं कि हिमाचल प्रदेशाचं मृदू सौंदर्य दिसायला लागतं . दिल्लीपासून चंदिगढ पर्यंत डोंगर नावाला सुद्धा दिसत नाही. पण एकदा का चंदिगढ ओलांडलं कि सर्वबाजूनी डोंगर आणि वळणा वळणाचे रस्ते सुरु होतात. आम्ही निघालो तेव्हा दिल्लीत नेहेमीप्रमाणे प्रचंड उकाडा होता पण प्रवासात चंदिगढ च्या पुढे पावसाला सुरुवात झाली. आकाशातले काळे ढग,आजूबाजूचे हिरवे कंच डोंगर, डोंगरातून धावत निघालेला रस्ता असा प्रवास छान सुरु होता. सोलन च्या पुढे साधारण दहा बारा किमी वर दागशाई येतं . ह्या कॅंटोन्मेंट मध्ये जाण्यासाठी घ्यायचं वळण हमखास चुकू शकेल असं . आणि ते जर चुकलं तर बरंच पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो. आमच्या मित्राने हे सगळे महत्वाचे सल्ले आम्हाला दिलेले असल्याने आम्ही बरोबर दागशाई चं वळण घेऊन एक प्रचंड चढ कारने चढून कॅंटोन्मेंट परिसरात पोचलो. अगदीच छोटीशी कॅंटोन्मेंट. कॅंटोन्मेंट बोर्ड च्या एका बंगल्यात आमची राहायची व्यवस्था होती, बाजूलाच कॅंटोन्मेंट च्या सीईओ चं टुमदार ऑफिस पण होतं. पावसाचा जोर आता कमी झाला होता परिणामी माकडांची मोठी टोळी खेळायला बंगल्याच्या आवारात यायला बघत होती. माझ्या मुली आणि मी घाबरत घाबरत बंगल्यापाशी पोचलो. बंगल्याची रचना मजेशीर होती. आत शिरल्यावर एक रूम , त्याच्या बाजूला एक जेवायची रुम आणि त्याला लागून स्वयंपाकघर, त्या स्वयंपाक घराला आणखी एक दरवाजा परस्पर बाहेर जाता येईल असा, जेवणाच्या खोलीच्या पुढे एक बैठकीची खोली आणि त्याच्या पुढे दोन तीन पायऱ्या आणखी एका बेडरूम मध्ये उतरत होत्या. थोडक्यात काय तर सगळ्या खोल्या साधारण सरळ रेषेतल्या, वर उतरतं कौलारू छप्पर, बंगल्याच्या रचनेवर,तिथल्या फर्निचरवर ब्रिटिश प्रभाव जाणवावा इतपत. दुपारचं जेवण आटोपून थोडी विश्रांती घेऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो.

देशातल्या मोस्ट हॉंटेड जागांमध्ये दागशाई चा समावेश आहे हे आम्हाला वाचून माहीत होतं . त्यामुळे इथली सेमेटरी , प्रसिद्ध तुरुंग पाहण्याबद्दल मनात उत्सुकता होतीच. एरवी असते तशी इथे पर्यटकांची गर्दी सुद्धा नव्हती. दागशाई हे नाव कसं पडलं ह्या जागेला त्याची कथा आहे. मुघलांच्या काळात मृत्युदंड ठोठावलेल्या कैद्यांना म्हणे ह्या परिसरात पाठवायचे. इथे पाठवताना त्यांच्या कपाळावर निशाणी केली जायची, दाग - ए - शाही . त्याच नाव मग दागशाई असं रूढ झालं . आमच्या  बंगल्याच्या अगदी जवळ तुरुंग होता. ह्या तुरुंगाचं एक वैशिष्ट्य असं कि नथुराम गोडसे ह्यांना ह्या तुरुंगात ठेवलं होतं काही दिवस. तुरुंगाचे फ्लोअरिंग लाकडाचं होतं . तिथल्या अत्यंत अरुंद आणि अंधाऱ्या कोठड्या पाहून अस्वस्थ व्हायला झालं. जेमेतेम उभं राहता येईल एवढीच जागा. ह्या अशा जागेत तासन्तास आणि दिवसानुदिवस राहायची वेळ ज्यांच्यावर आली असेल त्यांची दया येतेच पण अशी क्रूर शिक्षा एक माणूस दुसऱ्या माणसाला देऊ शकतो ह्या विचारानेही अस्वस्थ व्हायला होतं . ह्याच तुरुंगातल्या अंधार कोठड्या घुसमटवून टाकणाऱ्या होत्या. असं म्हणतात कि नथुराम गोडसे हे ह्या जेलमधले शेवटचे कैदी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षांनी ह्या तुरुंगाचे रूपांतर म्युझियम मध्ये करण्यात आलं. महात्मा गांधी ह्या तुरुंगात दोन दिवस राहिले होते,कैदी म्हणून नाही. ते इथे आयरिश कैद्यांना भेटायला आले होते. आता जरी हि वस्तू म्युझियम असली तरी कोणे एके काळी हा तुरुंग होता, इथे अनेक कैद्यांनी अनेक प्रकारच्या यातना सहन केल्या असणार, आशा निराशेची आंदोलनं ह्या कैद्यांनी अनुभवली असणार, तुरुंगाच्या अधिकाऱ्यांच्या क्रौर्याच्या इथल्या भिंती साक्ष असणार. त्यामुळे का माहित नाही पण इथल्या वातावरणात उदासपणा आणि अस्वस्थता पसरल्यासारखी वाटली. 





तिथून आम्ही बाहेर पडलो तोवर पाऊस भुरभुरायला लागलेला, तरी आम्ही नेटाने सेमेटरी कडे निघालो. ह्या स्मशानात मेरी नावाच्या ब्रिटिश बाईचं भूत तिला पुरलं तिथे वावरत असा समज आहे. मेजर जॉर्ज वॅटसन आणि त्याची पत्नी मेरी दागशाई मध्ये राहात होते. त्यांना मुलबाळ नव्हतं . कोणातरी संताच्या आशीर्वादाने मेरी ला दिवस राहिले. पण दुर्दैवाने आठव्या महिन्यात मेरीचा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला. मेरीची कबर बांधण्यासाठी मार्बल इंग्लंड वरून मागवला होता म्हणे. कालांतराने असा समज पसरला कि ह्या कबरीच्या मार्बलचा तुकडा प्रेग्नन्ट बाईने घेतला तर तिला मुलगा होतो.  परिणामी मोठ्या प्रमाणावर इथे येऊन लोक मार्बलचे तुकडे घेऊ लागले. . आपल्या कबरीचं रक्षण करण्यासाठी मेरी इथे वावरायची म्हणे. आम्ही पोचलो तेव्हा सेमेटरी चं प्रवेशदार बंदच होतं. तिथला बोर्ड वाचला, तिथून दिसणारी गर्द हिरवाई पाहिली आणि आम्ही कॅथेड्रल पाहायला निघालो. तुरुंगात वाटली तशी अस्वस्थता ह्या सेमेटरी मध्ये वाटली नाही. सेमेटरी असूनही अस्वस्थता वाटली नाही हे विशेषच. मृत्यू हेच मानवी आयुष्याचं अंतिम सत्य आहे ह्याची जाणीव सर्वानाच मनामध्ये असते म्हणूनही असेल कदाचित. एव्हाना पावसाने पुन्हा जोर धरला होता. संध्याकाळ व्हायला लागलेली. आम्ही आमच्या बंगल्यामध्ये परत जायचं ठरवलं. बंगल्याच्या आवारातही चांगलाच अंधार होता. वीज नाही कि काय अशी शंका लगेच आमच्या मनात आल्याशिवाय राहिली नाही. पण वीज होती. बाकी फार काही करण्यासारखं नसल्याने जेवून झोपलोच लवकर. पहाटेकडे माकडांनी छपरावर मारलेल्या उड्यांमुळे जाग आली. बंगल्याच्या आवारात बसून समोरचे हिरवेगार डोंगर पाहायला मजा येत होती. दिल्ली मुंबई सारख्या शहरात नसणारी प्रसन्न शांतता होती. दागशाई मध्ये भुतं आहेत का नाही माहीत नाही. पण दागशाई सुंदर,  शांत आणि टुमदार आहे ह्यात शंका नाही. नेहेमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी भेट द्यायची इच्छा असणाऱ्या पर्यटकांनी जरूर जावं अशी जागा आहे हि. 


Wednesday, 28 May 2025

रातापानी


 कामानिमित्ताने भोपाळ ला काही वेळा जाणं झालं होतं माझं . त्यामुळे भोपाळ मधली प्रेक्षणीय स्थळं , त्याच्या जवळचं सांची आणि भीमबेटका हे बघून झालं होतं . त्यामुळे ह्यावेळी मी भोपाळला गेले तेव्हा हातात अर्धा दिवस रिकामा होता तेव्हा काय करावं असा प्रश्न मनात होता. अचानक कोणीतरी म्हटलं, " तुम्हाला जंगलात फिरायची आवड आहे आणि हातात मर्यादित वेळ आहे तर तुम्ही रातापानी व्याघ्रप्रकल्पाला जाऊन येऊ शकता. जंगल म्हटल्यावर माझा उत्साह वाढला. मी लगेचच गुगल इत्यादी माध्यमातून माहिती मिळवली. मध्य प्रदेश सरकारच्या जंगल सफारी बुकिंगच्या संकेतस्थळावरून सफारी बुकिंग केलं . भोपळवरून रातापानीला पोचायला साधारण पाऊण तास लागतो. भोपाळ शहरातून बाहेर पडलं कि सरळसोट रस्ता आहे . आम्हाला भोपाळमधून निघायला थोडा उशीर झाला, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लवकरच उजाडलेलं होतं . आम्ही जिप्सीमध्ये बसून व्याघ्रप्रकल्पात प्रवेश केला. हा प्रकल्प तुलनेने नवीन असल्यामुळे इथे पर्यटकांचा वावर मर्यादित आहे. त्यात आम्हाला उशीर झालेला असल्याने आसपास एकही जिप्सी नव्हती. जंगल बऱ्यापैकी सुकलेलं होतं . त्यामुळे आम्हाला वन्यप्राणी चटकन दिसतील  अशी आशा होती. आमच्याबरोबरच्या वन विभागाच्या माणसाला जंगलाची चांगली माहिती होती. त्यामुळे प्राणी दिसत नसले तरी जंगलाबद्दल छान माहिती मिळत होती. अर्ध्या पाऊण तासाच्या जिप्सी प्रवासानंतर एका ठिकाणी जिप्सी थांबली. बरोबरच्या वन विभागाच्या माणसाने आम्हाला खाली उतरायला सांगितलं. मला जरा आश्चर्यच वाटलं. जंगलात उतरण्यासाठी जागा ठरलेल्या असतात. तिथे साधारणपणे स्वच्छतागृह इत्यादी सोय असते. पण इथे तसं काहीच दिसत नव्हतं. 



आम्ही जिप्सीमधून खाली उतरलो आणि वन खात्याच्या माणसामागून एक चढ चढायला लागलो. मला तर काळातच नव्हतं कि कुठे चाललो आहोत. पण आपण कुठे आणि कशासाठी चाललो आहोत हा प्रश्न मी त्याला विचारला नाही. दोनेक मिनिटात आम्ही चढून थोड्याशा सपाट जागेवर पोचलो. एका मोठ्या दगडाचा काही भाग  तुटून हा सपाट भाग तयार झाला असावा असं वाटलं. चढून वर पोचलो आणि त्या मोठ्या दगडाकडे त्या माणसाने बोट दाखवलं. त्या दगडावर चित्र होती. हजारो वर्षांपूर्वीच्या माणसांनी काढलेली रंगीत रेखाचित्र होती. क्षणभर मला काही कळेचना. जंगलात वन्यप्राणी बघायला आलेल्या माझ्या समोर माझ्याच हजारो वर्षांपूर्वीच्या पूर्वजांनी काढलेली  रेखाचित्र होती. त्या रेखाचित्रांकडे मी मंत्रमुग्ध होऊन पाहायला लागले. एक मोठा गेंडा किंवा बैलासारखा प्राणी होता. त्याचं एक बाकदार शिंग, आखूड शेपटी, चित्रात अधूनमधून आपल्या वारली पेंटिंगमध्ये असतात तशा माणसांच्या रेखाकृती. त्यात एका माणसाच्या हातात धनुष्य बाणासारखं काहीतरी दिसत होतं . चित्राच्या दुसऱ्या भागात एक चौकोनी चिन्हासारखं काहीतरी होती, हरिणांची रांग होती. काही  चित्रकृती स्पष्ट होत्या , काही काळाच्या ओघात अस्पष्ट झाल्या होत्या. इतिहासासारख्याच . काही गोष्टी लख्खपणे माहीत झालेल्या , काही गोष्टी अजूनही धूसर असणाऱ्या. भीमबेटकाची जगप्रसिद्ध चित्र मी काही वर्षांपूर्वी पहिली होती. हे चित्र पाहिल्यावर मला अचानक लक्षात आलं कि भीमबेटका हे रातापानी जंगलाचाच भाग आहे. ह्यावेळी मी रातापानी चं जंगल पाहायला आलेले आणि अचानक हि चित्र भेटली. 


काही वर्षांपूर्वी पाहिलेली भीमबेटका मधली रेखाचित्र आणि हि चित्र हि समकालीनच असणार. पण हजारो वर्षांपूर्वी माणसांनी हे अंतर कसं कापलं असेल? किंवा तिथली चित्र आणि इथली चित्र काढणारी माणसं वेगळीच असतील का? एवढ्या हजारो वर्षांपूर्वी ती चित्र काढणाऱ्या माणसांना वाटलं तरी असेल का कि हजारो वर्षानंतर त्यांचेच कोणीतरी वंशज आश्चर्याने हि चित्र पाहतील? मुळात कोणी पाहावी म्हणून हि चित्र त्या माणसांनी काढली असतील का? कि वेळ घालवण्याचं साधन, विरंगुळा, स्वतःला व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून  हि चित्र काढली असतील? ह्या चित्रांमधल्या मानवी आकृतींमध्ये पुरुष आणि स्त्री असा भेद काही स्पष्ट जाणवत नव्हता. म्हणजे त्या काळात  स्त्री आणि पुरुष असा भेद फारसा नव्हताच कि काय? अशीही एक शंका माझ्या मनात येऊन गेली. हजारो वर्षांपूर्वीच्या माणसांमध्ये आणि माझ्यामध्ये त्या भिंतीवरची ती स्पष्ट अस्पष्ट रेखाचित्र हा एक दुवा होता. तेव्हापासूनच माणसं चित्र काढत होती. आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी रेखाचित्रांमधून मांडत होती. हि चित्र एकाच व्यक्तीने काढली असतील कि अनेकांनी काढली असतील? ती काढल्यावर त्यांनी ती एकमेकांना उत्साहाने दाखवली असतील का? आज आम्हाला चढून जाऊन हि रेखाचित्र पाहावी लागली, हजारो वर्षांपूर्वी इतक्या वर ते लोक का आले असतील? आणि ह्या उंच दगडावर चित्र काढण्यासाठी तेवढी उंची होती का त्यांची? त्यावेळच्या माणसांची भाषा कशी होती? ते एकमेकांशी कसा संवाद साधत असतील? ह्या चित्रातली काही चिन्ह हि भाषिक चिन्ह असतील का? दगडावरच्या त्या चित्रांकडे मंत्रमौग्ध होऊन पाहत असतानाच हे सगळे प्रश्नही डोक्यात घोंगावत होते. त्यातल्या बहुतेक  प्रश्नांची एकदम बरोबर उत्तरं नव्हतीच मिळणार. अंदाजच बांधायचे त्या चित्रांबद्दल. पण हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाशी आपल्याला जोडण्याची विलक्षण ताकद त्या चित्रांमध्ये होती . जीवनाच्या सातत्याचा तो एक रेखीव पुरावाच म्हणायचं. 





Monday, 26 May 2025

अमलताश

 २००२ मध्ये मी मध्य प्रदेशात पंचमढीला गेले होते. मध्य प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या "अमलताश " नावाच्या छोटेखानी हॉटेल मध्ये आम्ही राहिलो होतो. "अमलताश हे नाव ऐकायला फारच छान होतं . पण तेव्हा अमलताश म्हणजे नक्की काय हे माहीतच नव्हतं. हिंदी भाषक प्रदेशाशी तेव्हा माझा संबंध कमीच होता. अमलताश म्हणजे काय हे विचारल्यावर कळलं कि हे उन्हाळ्यात पिवळी जर्द फुलं येणारं झाड आहे. २००२ मध्ये गुगल ची सोय नव्हती. कि पटकन टाईप करावं आणि विचारावं, अमलताश ला मराठीत काय म्हणतात. पण त्या हॉटेलच्या परिसरात एक अमलताश झाड आहे अशी माहिती तिथल्या माणसाने दिली. पिवळ्या फुलांनी लगडलेलं ते झाड पाहिल्यावर लक्षात आलं कि हा तर मराठीतला बहावा. 



नवी दिल्लीत  जवळपास सर्वच महत्वाच्या रस्त्यांवर  बहावा फुललेला पाहायला मिळतो . मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अमलताश फुलायला लागतो. त्याची पिवळी जर्द फुलं आणि पोपटी हिरवी पानं हि रंगसंगती दिल्लीच्या कडक उन्हाळ्यात मनाला शांती देणारी. इंडिया गेट च्या भव्य परिसरात अमलताश च्या फुलांचे पिवळे जर्द लोलक डुलताना पाहायला खूप मजा येते. इंडिया गेटमधून निघणारा एक रस्ता म्हणजे झाकीर हुसेन मार्ग, ह्या रस्त्यावरून उजव्या बाजूला सुब्रमणिया भारती मार्गावर तर अमलताश ची रांगच लागलेली आहे. त्याच्या फुलांचा सडा रस्त्याच्या डाव्या बाजूला उन्हाळ्याच्या दिवसात दिसत राहतो. चाणक्य पुरी हा दिल्लीतला डिप्लोमॅटिक एरिया. इथे अनेक देशांचे दूतावास आहेत. ह्या परिसरात मुळात परदेशात आढळणारी काही झाडं सुद्धा हमखास दिसतात. ह्या परिसरातही अधूनमधून अमलताश चा मनमोहक फुलोरा दिसत राहतो. 


दिल्लीतल्या झाडांबद्दल प्रदीप कृष्ण ह्यांनी " ट्रीज ऑफ दिल्ली " नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकात अर्थातच अमलताश बद्दल माहिती आहे. अमलताश ची फळं टणक  असतात. त्यामुळे ह्या झाडाच्या बियांचा प्रसार होऊन त्यांची संख्या  वाढवण्यात कोल्हा , अस्वल ह्या प्राण्यांची  मोठी भूमिका असते.  कोल्ह्यांना ह्या फळातला रस आवडतो. 



अमलताश चे काही फायदे मला भोपाळ जवळच्या रातापानी ह्या व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना ऐकायला मिळाले. रातापानी च्या जंगलात खूप अमलताश बघायला मिळाले. माझ्या बरोबर आलेल्या फॉरेस्ट गार्ड ने मला सांगितलं कि मध्य प्रांतातले आदिवासी अमलताश ची फुलं खातात . वर्षातून एकदा तरी अमलताश च्या फुलांची भाजी खाल्लीच जाते ह्याचा पोट साफ राहण्यासाठी उपयोग होतो. अमलताश च्या शेंगेबद्दल एक गमतीशीर गोष्ट त्याने मला सांगितली. अमलताश ची जी शेंग  असते ती गादी किंवा अंथरुणाखाली ठेवली तर ढेकूण होत नाहीत. रातापानी च्या सुकलेल्या जंगलात कडक उन्हाळ्यात अधूनमधून फुललेले अमलताश पाहून डोळ्यांना खूपच आराम मिळत होता. एके ठिकाणी अमलताश च्या फुलांचा फोटो काढायला आम्ही जिप्सी थांबवायला सांगितली तर त्या फॉरेस्ट गार्ड ने अमलताशच्या फुलांचा  छानसा झुपका आम्हाला  काढून दिला. 



अमलताश चा भरलेला दरबार पाहायचा असेल तर मात्र दिल्लीतल्या खान मार्केट जवळच्या अमृता शेरगील मार्गावर उन्हाळ्यात गेलंच पाहिजे. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं आहेत. आणि त्यातही अमलताश खूप आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दिल्लीतल्या नकोशा वाटणाऱ्या उन्हाळ्याने तुम्ही त्रासला असाल तर जीवाला शांत करण्यासाठी अमृता शेरगील मार्गावर जरूर जा. अमृता शेरगील ह्या चित्रकार होत्या. त्यांच्या अनेक पेंटिंग्स मध्ये लाल रंगाचा मुक्त वापर दिसतो. त्यांचं नाव असलेल्या ह्या रस्त्यावर उन्हाळ्यात हिरवा आणि पिवळा रंग निसर्गाने उधळलेला असतो . एखाद्या चित्रकाराचं नाव असणारा हा रस्ता चित्रासारखाच सुंदर दिसतो . ह्या रस्त्यावरचं हे मुक्त सौंदर्य पाहूनच ह्या रस्त्याला अमृता शेरगील ह्यांचं नाव दिलं असणार ह्याची खात्री पटते. रात्रीच्या वेळी अमलताश ची पिवळी झुंबरं वाऱ्यावर डुलत राहतात आणि रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात चमकत राहतात. फुलांचा मंद सुगंध हवेत भरलेला असतो. दिल्लीतला असह्य उन्हाळा सुसह्य करण्याची ताकद अमलताश मध्ये आहे नक्कीच. 



Tuesday, 30 May 2023

Glorious Amaltash

 


Delhi summer is not something that one looks forward to. Who would like temperatures in the 40s, blazing sun,  dust storms, hot dry winds. Come July/August and there is suffocating humidity. summers in Delhi would have been unbearable but for bright yellow Amaltash. If there is one thing which soothes my mind in summers, it is the sight of Amaltash. In scorching heat where everything seems to be drying up and burning, this tree is ready with its dangling yellow lobes which instantly catch your attention. Bright yellow flowers of this tree create a lovely contrasting combination with its green leaves. This beautiful sight starts with sporadic yellow lobes and before we realize, there is hardly any green left on the tree. When you are out for a morning walk or returning from a tiring day at work, Amaltash grips your mind with the yellow carpet of flowers on the ground, bunches of flowers swaying with the wind. Those yellow flowers leaving the tree and embracing earth are indeed an epitome of life cycle. 





Amaltash trees are seen in abundance in New Delhi. Most striking sight is at Amrita Shergil Marg. This road looks picture perfect with Amaltash in full bloom on both sides of the road. The road is as beautiful and colourful as paintings of Amrita Shergil. All residential colonies in New Delhi proudly carry Amaltash. When one is driving on Subramania Bharti Marg or in India Gate circle during summers, a canopy of yellow danglings and carpet of yellow flowers makes the drive . Whether you are walking or driving, you keep getting glimpses of the yellow blossom of this Indian Laburnum. One look at this blossom and we know what nature showers upon us. Whether we care for those trees or not, whether we observe their beauty or not, they blossom as if they are leading by example. They are showing humans to blossom and be happy irrespective of surroundings. These trees  are equally beautiful at night. Street lights add golden shade to the flowers and they indeed look like little golden chandeliers swaying to the tunes of a breeze. But for these Amaltash, summer would have indeed been unbearable. 






Friday, 31 March 2023

राजधानीतली हिरवाई


इतर कुठच्याही महानगरापेक्षा नवी दिल्लीत झाडांची संख्या जास्त आहे. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, संसद भवन, पुराना किला , सुंदर नर्सरी,लोदी गार्डन्स,नेहेरु पार्क,हुमायून टोम्ब , सफदरजंग टोम्ब ह्या सगळ्या ठिकाणी असणारी जुनी आणि विविध प्रकारची झाडं म्हणजे नवी दिल्लीतला हिरवा खजिनाच म्हणायला हवा. झाडांचे बरेच प्रकार इथे असल्याने वेगेवेगळ्या ऋतूतली झाडांची बदलती रूपं बघण्याचा आनंद इथे मिळतो. नवी दिल्लीची  राजधानी म्हणून आखणी केली ल ल्युटेन्स नावाच्या आर्किटेक्त्त ने, त्यामुळे ह्या परिसराला ल्युटेन्स दिल्ली असंही म्हटलं जात. राजधानीची उभारणी होत असतानाच इथल्या महत्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा झाड लावली गेली, ह्यांना ऍव्हेन्यू ट्रीज असंही म्हणतात. एकदा उन्हाळ्यात अशोक रोडवरून जाताना रस्त्याच्या दुतर्फा जांभळं विकणारे लोक दिसले. नंतर लक्षात आलं कि ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जांभळाची बरीच झाडं आहेत.  इंडिया गेट मधून हे दहा रस्ते फुटतात त्या प्रत्येक रस्त्यावर विशिष्ट प्रकारची झाडं लावलेली आहेत. अशोक रोडवर जशी जांभळाची झाडं आहेत तशी शाहजहान रस्त्यावर अर्जुन वृक्ष आहेत, पंडारा रोडवर प्रामुख्याने नीम आहे. भर उन्हाळ्यात ह्या रस्त्यावर नीम वृक्षाची पानं गळताना बघायला मजा येते. इंडिया गेट परिसरातही वेगवेगळी झाडं आहेत. पूर्वीचा राजपथ आता कर्तव्य पथ . ह्या कर्तव्य पथाच्या दोन्ही बाजूला जांभळाची बरीच झाडं आहेत. इंडिया गेट च्या सर्कल मध्ये पिंपळ,आंबा,अर्जुन,नीम , गुलमोहोर हि झाड हमखास दिसतात. इथे काही मोठे आणि चांगले जुने वटवृक्षही आहेत. ह्या वटवृक्षानी इंडिया गेट च्या राजस सौंदर्यात भरच पडते. जणू काही हे वृक्ष दिल्लीत घडलेल्या वर्षानुवर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार. असं म्हणतात कि लोदी रोड वरची काही झाडं हि शेरशहा सुरीच्या काळात लावली गेली होती. खरं खोटं मला माहित नाही पण लोदी रोड वर अनेक जुनी झाडं आहेत . जवळच्या लोदी गार्डनमध्येही खूप वेगवेगळी झाडं पाहायला मिळतात. 



नवी दिल्लीतला माझा सर्वात आवडता रस्ता म्हणजे अमृता शेरगील मार्ग. खान मार्केटमधून निघणारा आणि लोदी रोडवर पोचणारा अमृता शेरगील मार्ग. अमृता शेरगील ह्या कलाकार बाईंचं नाव सार्थ करणारा हा चित्रवत सुंदर रस्ता . अमृता शेरगील चित्रकार होत्या. २०  शतकातल्या महत्वाच्या स्त्री चित्रकार. ह्या रस्त्याच्या दुतर्फा मोठी आणि श्रीमंत मंडळींची घरं आहेत. ह्या घरांची सुंदर लॉन्स किंवा बागेतली झाडं बाहेरच्या रस्त्याकडे उत्सुकतेने पाहत असतात. ह्या रस्त्याच्या दुतर्फा बहाव्याची झाडं आहेत. हिंदीत बहाव्याला अमलताश असं भारदस्त नाव आहे. भर उन्हाळ्यात अमलताश बहरलेला असतो. त्याच्या पिवळ्या जर्द फुलांचा सडा  अमृता शेरगील मार्गावर पडलेला असतो. दिल्लीतलं तापमान ४० च्या पुढे गेलेलं असतं , उन्हाळ्याने जीव नकोसा झालेला असतो अशावेळी ह्या बहाव्याच्या सुखद दर्शनाने मन शांत  व्हायला वेळ लागत नाही. 

अमृता शेरगील मार्गाव्यतिरिक्त दिल्लीत अनेक ठिकाणी अमलताश दिसतो. त्याच्या फुलांचा सोनेरी सडा अनेक ठिकाणी पडलेला दिसतो. ह्या बहाव्याच्या फुलांचे लोलक जागोजागी डुलताना दिसतात. दिल्ली हायकोर्टाच्या जवळ असणाऱ्या सुब्रमणिया भारती मार्गावर,पुढे अकबर रोडवर बरेच अमलताश आहेत, अगदी सप्टेंबर पर्यंत पिवळ्या जर्द फुलांचे लोलक डुलताना दिसतात. एखादी वाऱ्याची झुळूक आली कि त्या  मनमोहक हालचाल होते त्याने उन्हाळ्यामुळे झालेली तगमग सुद्धा विसरायला होईल. 

दिल्लीतली थंडी ओसरायला लागते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते तेव्हा अनेक ठिकाणी काटेसावर बहरायला लागते. झाडावर एखाद दोन लाल किंवा पिवळी फुलं एखाद्या दिवशी दिसतात आणि मग अचानक सगळं झाड निष्पर्ण झालेलं असतं आणि फांदीफांदीवर फुलं फुललेली दिसतात. ह्याही फुलांचे हळदी कुंकू वाटावं असे लाल पिवळे सडे पडलेले असतात. इंडिया गेट मधल्याअकबर रोड वर वाणिज्य भवन हि इमारत आहे. ह्या वाणिज्य भवनाच्या परिसरात दोन लालभडक काटेसावर आहेत. अकबर रोड आणि मौलाना आझाद रोड च्या जंक्शन वरही एक लाल काटेसावर आहे. वाणिज्य भवनाच्या भोवती चक्कर मारली तर ह्या सगळ्या काटेसावर उठून दिसतात. काटेसावर ला हिंदीत सेमल म्हणतात. संपूर्ण झाडावर एकही पान नाही, फांद्यांचे तपकिरी स्ट्रोक्स आणि त्या स्ट्रोक्सना फुटलेली सुरेख फुलं . चित्रच जणू. उन्हाळ्यात बहाव्या बरोबर फुलणारा गुलमोहोर. लाल,पिवळा गुलमोहोर पण जागोजागी फुललेला असतो. उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणात गुलमोहोर हि जणू तापलेला असतो. दिल्लीत गुलमोहोर पार्क नावाचा परिसर आहे आणि तिथे खरोखरच गुलमोहोराची बरीच झाडं आहेत. उन्हाळ्यात फुलणारं आणखी एक झाड म्हणजे जॅकरांदा. ह्याला हिंदीत निली गुलमोहोर म्हणतात. ह्याची निळसर फुलं लक्ष वेधून घेतात. निळ्या फुलांचं प्रामाण इतर रंगाच्या फुलांपेक्षा कमीच त्यामुळेही हि फुलं लक्ष वेधून घेतात. झाकीर हुसेन मार्गावरच्या घरांपैकी एका घराच्या आवारात हा जॅकरांदा मी पाहिलेला आहे. 


दिल्लीतल्या झाडांबद्दल प्रदीप किशन ह्यांचं, ट्रीज ऑफ दिल्ली ह्या नावाचं सविस्तर पुस्तक आहे. ह्या पुस्तकामुळे दिल्लेतल्या झाडांबद्दल मला बरीच माहिती मिळाली. दिल्लीच्या भौगोलिक स्थानाचा आणि इथल्या झाडांच्या प्रकारांचा जवळचा संबंध आहे. दिल्लीच्या पश्चिमेला वाळवंटी प्रदेश येतो आणि पूर्वेला कोरडी आणि पानगळ होणारी झाडं (Dry and Deciduous forest ) पूर्व आणि पश्चिमेच्या झाडांच्या मधली  thorny forest इथे आहेत. त्यामुळेच बाभूळ,खैर हि झाडं पण इथे मोठ्या प्रमाणावर दिसतात. दिल्लीतल्या झाडांच्या प्रकाराला monsoon forest असाही म्हणतात. ह्या नावाचं मला आश्चर्यच वाटलं. ह्या प्रकारात असलेल्या झाडांची कोरड्या हवेत पानगळ सुरु होते. पावसाळा संपल्यावर साधारण तीन चार महिन्यांनी हि पानगळ सुरु होते. दिल्लीत साधारण फेब्रुवारी मार्च ह्या महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. ह्या झाडांच्या पानांना साधारण मार्च एप्रिल महिन्यात सुंदर लालसर छटा येते. अशी लालसर पानं असलेली बरीच झाडं मार्च एप्रिल महिन्यात दिसतात. सर्वात उठून दिसतो तो पिंपळ. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत गोठून जातात बहुतेक हि झाड आणि पानं . जेव्हा हवेत उबदारपणा यायला लागतो तेव्हा ती आपले रंग दाखवायला लागतात आणि येणाऱ्या उन्हाळ्यासाठी तयार व्हायला लागतात. 


मी काही झाडं ,फुलं ह्यांची जाणकार नाही. पण रोज ऑफिसला जाताना, सकाळी चालताना, हिवाळ्यात सुंदर नर्सरी किंवा लोधी गार्डन इथे सहलीला गेल्यावर आजूबाजूची वेगवेगळी झाड दिसतात. त्यांचं निरीक्षण करून काही गोष्टी समजतात. काही गप्पांमधून समजतात. काही वाचनातून समजतात.  ह्या झाडांमध्ये होणारे बदल टिपणं हा माझ्या आनंदाचा एक भाग आहे. निसर्गातली व्युत्पत्ती आणि लय हे ह्या झाडांच्या निमित्ताने पाहायला मिळतं . रसरसून फुलणारी फुलं पाहिल्यावर जगण्यातले विविध रंग आठवतात. आज फुललेलं फुल उद्या जमिनीवर पडलेलं पाहिल्यावर आयुष्याची नश्वरता जाणवते. पण जेवढा वेळ ते फुल फुललेलं असतं तेवढा वेळ ते सगळ्यांना आनंद देत असतं हि पण शिकण्यासारखीच गोष्ट. महानगरात राहूनही असा हिरवागार आनंद रोज मिळण्यासारखं भाग्य नाही हेही तितकच खरं . 



Sunday, 19 March 2023

Delhi Rains

 It is a Saturday morning in Mid March, it is neither winter nor summer in Delhi.  I wake up with sounds of rustling of leaves and rain drops. . Being March it is not even monsoon time in Indian continent. And light rain continues almost for the whole day, leaving me surprised.  My next few years in Delhi, I realized that this place gets intermittent rains throughout the year.  For a person like me who is essentially from Mumbai, rains are associated with Monsoon.  Since the last few years, climate changes are  causing untimely rains occasionally. Still rain means monsoon. 

Interestingly, during monsoon, the amount of rain that we get to experience in Delhi is much less. But throughout the year there are episodes of light showers. I relocated from Mumbai to Delhi in summer. Scorching dry heat of Delhi summer was a challenge to reckon with. And  one day which was unusually hot and dry, suddenly in the evening, winds laden with dust started blowing, sky got grey and soothing rain drops made their way to cracked soil. Fragrance of the soil and the unexpected drop in temperature had soothing magic on my mind and body. 

Delhi has a long summer. Almost 6 months of the year, the weather remains hot. Initially it is hot and dry and later it is hot and humid. Hot and dry part of the summer gets episodic rain. Delhi, being part of great North Indian planes, dust blows with winds. In summers, even tree leaves seem soaked in dust. Light showers do wonders to trees. Few drops of rain and leaves seem to get a fresh green coat. When the temperature feels impossibly high, these showers bring hope. When heat is weighing you down, these little rain drops give a signal of freshness, signal of green future. These showers apparently bring flavour to mangoes here. I have a fortune of having a local mango tree within premise of house allocated to me by the Government. In the first year of mango season in Delhi, I was surprised to know that mangoes in North India arrive much later than mangoes in Western India. One summer evening when there were rains, I heard my help saying, ab aam me swaad aayega. 


When Indian sub continent especially southern India and parts of western India are lashed with rains, Delhi is still expecting arrival of monsoon. But it arrives with great fanfare here. Lightening, thunders and rain. One doesn't really get long spells of rains here.  But even light showers are good enough for water logging, traffic chaos, power failure and comments, kitni barish ho rahi hai. 
Winter rains is an interesting phenomena in Delhi. Some of us may remember  Republic Day celebrations in 2015, when erstwhile President of USA, Mr. Barack Obama was a guest for Republic Day Parade. Winter rains welcomed President Obama in Delhi for Republic Day Parade. Newspapers and media were full of photos of Mr. Obama and India's Prime Minister Narendra Modi, chatting and seemingly enjoying rain showers.  Western disturbances get Winter Rains adding freezing quotient to already frozen Delhi. In 2023, winter rains drenched guests and participants of Beating The Retreat Ceremony at Vijay Chowk. This ceremony marks the conclusion of Republic Day Celebrations in Delhi. 

Rain spells through out the year, indeed keep one's mind and soul fresh. It is like cleaning dust once in a while and getting green, fresh and rejuvenated. 

Monday, 28 November 2022

Green Journeys

 I grew up in a space crunch city of Mumbai. Sky rocketing apartments in Mumbai give limited scope for personal garden. At the most I  could have a  plant or money plant. I always had an awe for some enthusiastic friends who grew lots of plants in small balconies or even verandahs. 2018 and I come to space rich Delhi. My Government job gets me a house with a big terrace. A short walk in the colony and I see ground floor houses with well manicured lawns and neatly grown flowers. To compete with them with equal grace were terrace gardens, with hanging plants beautified with dangling lamps and lovely flowers. 


Soon after I shifted to the house, Malis started making rounds to check if they could get some work. Since I'm new to this entire thing, I wasn't sure if I would need one. I decided to give it a try. When I decided to give it a try, my enthusiasm was naturally at its peak and I had no idea about the journey ahead of me. First and foremost challenge was to water plants regularly. And watering plants is not like giving a glass of water. Giving a glass of water would at the most involve options like Cold Water, normal water or mix water. In Delhi winters, it may be warm water too.  Most importantly, you can ask what kind of water one wants. With plants, there is no asking. It is only to be understood. Plants will give you signals but not answers. You would see yellow leaves, brown leaves, cracked soil or mushy soil and you have to understand what it means. In scorching summers, if you forget to water plants even for a day, you may witness wilted flowers, dried leaves and cracked soil. If you simply pour water on plants, you may soon see yellowing of leaves or layers of algae on soil. the amount of water to be given to plants, the way it is to be given and even the time at which it is given, is all to be understood through a silent yet eloquent interaction with plants. In summers you have to water plants before day breaks or after dusk. In winters the amount of water required is less as compared to summers.

Taking care of plants has multiple facets. It is indeed a pleasure to see plants growing, flowering and even bearing fruits. All this doesn't come easily. There are moments of expectations, eager waiting and even frustrations and depressions. You see nice purple flowers growing on a brinjal plant and have high hopes of dark purple brinjals growing from them. But there are monkeys eating them or some sudden storm cuts short the life of that delicate flower.  Gardening takes you through lots of ups and downs. There would be plants, in spite of your best efforts, they don't grow, they don't bear flowers or fruits. You keep thinking what is wrong with this plant. Am I making any mistake? Is there something more that I need to do for this plant? But some questions always remain unanswered. Some puzzles are never resolved. At the same time, you will have a bunch of ever growing, ever smiling plants. They are like enthusiastic people around you. They always make you feel happy with their cheerfulness. Every time there is a breeze these plants would dance to the tune of the breeze. every time there are showers, these plants would turn freshly green. They remind you of ever growing, ever changing yet interesting life. 

Don't miss the trimming, pruning, and loosening of soil activities. They are the activities where you actually dirty your hands and what pleasure is it. Before I got interested in gardening, I hardly knew how it feels to loosen the soil and make the fresh air available to the roots. It is like you opening up the windows for someone who has been locked up in a room. It is like pumping new life, opening new doors, opening opportunities. Gives you a feel of journey from darkness to light, from despair to hopes ,from lethargy to enthusiasm. Loosening soil is a delicate activity especially when you are doing it in a pot which has plants. You need to do it with utmost care, you need to ensure that you don't hurt roots and still make fresh air available to them. It is almost like changing the clothes of a sleeping baby without waking her up. Pruning and trimming is yet another way of infusing new and fresh life in plants. How much to cut, how to cut is all to be learned. sometimes you would cut much more than required. Sometimes you don't cut enough to allow new growth. 

Gardening is a treat for all our sensory organs. You can see plants, smell plants,  feel plants,  taste plants and also hear their music if you are willing to. Holding a small tomato or a pumpkin which is grown in your garden is as satisfying as holding a newborn baby. Checking colour, size, shape ,smell and texture of veggies and fruits and flowers grown in your garden distresses you. It is like transcending in different world for short time and enjoying pure joy. 

Keep enjoying green journeys.  

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...