ह्यावर्षी मी आळंदी ते पंढरपूर अशी पायी वाटचाल करून आले . मी जेव्हा ह्या प्रवासाला निघणार होते तेव्हा बरीच मंडळी म्हणायची वारीला चाललीस का , तेव्हा मी हो म्हणायचे पण आळंदी ते पंढरपूर चालून आल्यावर माझ्या प्रवासाला वारी म्हणायची मलाच लाज वाटायला लागली. भक्ती रसात पूर्ण चिंब होऊन, विठ्ठल भेटीचा एकमेव ध्यास घेऊन , कुठच्याही सुख सुविधांची अपेक्षाही न बाळगता चालणारे वारकरी कुठे आणि आपण कुठे! शेकडो वर्षांपासून विठ्ठल भक्तीचा हा महापूर अवघा महाराष्ट्र अनुभवतो आहे. हजारो वर्षांपासून लाखो वारकऱ्यांना समाविष्ट करून घेणारी हि कुठची जादू आहे? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो पावलं पंढरीच्या दिशेने चालत असतात, त्यांच्या मुखी असतो विठूनामाचा गजर , मनात असते पंढरीच्या दर्शनाची आस. विठ्ठल भेटीची आस मनात ठेवून चालणारी हि माणसं विठ्ठलाचं दर्शन झालं नाही तरी निव्वळ कळसाच्या दर्शनाने भरून पावतात. किती थोर भक्ती म्हणायची हि.

आळंदीहून माऊलींची पालखी निघते तिथूनच आम्ही पण आमची वाटचाल सुरु केली. माउलींच्या पादुकांच्या दर्शनाने ह्या वेगळ्या वाटचालीची सुरुवात झाली . ज्या दिवशी माऊलींची पालखी आळंदीहून निघते त्याच दिवशी पहाटे आम्ही आळंदीतून निघालो. आळंदीच्या दिशेने झपाझप पावलं टाकत जाणारे अनेक वारकरी आम्हाला जागोजागी दिसत होते. त्यांच्या हातात एखादी छोटीशी पिशवी, पायात जेमतेम चपला. माझ्यासारख्या शहरी,पांढरपेशा व्यक्तीच्या मनात येई, कसा काय हा अडीचशे किलो मीटरचा पल्ला हि मंडळी गाठणार ह्या तुटपुंज्या गोष्टींवर. मला तेव्हा हे कळतच नव्हतं कि मला आवश्यक वाटणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी अनावश्यक होत्या. त्यांचं एकमेव उद्दिष्ट विठ्ठल दर्शन. पंढरपूर नागरीपर्यंत पोचणं हेच त्यांचं ध्येय होतं. हजारोंच्या संख्येने वारकरी आळंदीत पोचत असले तरी कुठे पोलिसांची गर्दी,मोठा बंदोबस्त दिसत नव्हता. एवढ्या गर्दीला आवर घालायची वेळ आलीच तर लागतील एवढेच पोलीस होते जागोजागी. वारकऱ्यांची स्वयंशिस्त एवढी जबरदस्त असते कि आपल्या दिंडीच्या बाहेर कुणी भटकला असं सहसा होत नाही. कोणाच्या हातात टाळ , कोणाच्या हातात एकतारी , कोणाच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि सर्वांच्या मुखी हरिनाम. आमचा पहिला प्रवासाचा टप्पा आळंदी ते पुणे हाच होता. जागोजागी पालखीच्या स्वागताची तयारी सुरु होती. आमच्यासारखी पालखीच्या पुढे चालणारी मंडळी होती. एकेकटे चालणारे वारकरी पण खूप होते. उस्मानाबाद,औरंगाबाद,कोल्हापूर अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले वारकरी जागोजागी भेटत होते. सर्व वारकरी मंडळी एकमेकांना माउली म्हणतात हि मनाला अतिशय भावणारी गोष्ट. वारकऱ्यांचं वय काय, तो पुरुष आहे का स्त्री आहे,कुठच्या गावातून आलाय, त्याचा व्यवसाय नोकरी काय कशाचीही पर्वा नाही. एकमेकांना माउली म्हणून आपपर भाव क्षणार्धात संपवायचा . आपुलकीचे,प्रेमाचे ,भक्तीचे पूल बांधायचे. नुसतं माउली म्हणायचं नाही तर एकमेकांच्या पाया पडायचं. नम्रपणाचं हि किती लोभस रूप. मी आळंदीहून पायी प्रवास सुरु केला तेव्हा माझ्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झालेलं होतं आणि त्यामुळे हाताला प्लास्टर होतं . वाटेतली एकही माउली त्या प्लास्टर बद्दल चौकशी न करता पुढे जायची नाही. काय झालं हाताला माउली ? हा प्रश्न. मग मी सांगितलं कि बोटाचं हाड मोडलंय , कि समोरची माउली म्हणणार होईल बरं , कोणी म्हणणार माउली करतील बरं . किती हा विश्वास माऊलीवरचा . ह्या अशा आश्वासनांनी पहिल्याच दिवशी माझी खात्री झाली कि पंढरपूर पर्यंतचा आपला प्रवास माऊलीच आपल्याकडून करून घेणार.
पंढरपूरकडे निघालेल्या पालख्या, दिंड्या ह्यांचा मार्ग ठरलेला आहे, विसाव्याच्या जागा ठरलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी पालखीच्या स्वागताला,माउलींच्या पादुकांवर डोकं ठेवायला मंडळी आसुसलेली असतात. आम्ही पण पालखी मार्गावरूनच निघालो होतो पण आम्हाला पंढरपूरपर्यंतचा पल्ला आठ ते नऊ दिवसात गाठायचा होता त्यामुळे दररोज सरासरी ३० किमी चालायचं होतं. नियमित व्यायाम करणाऱ्या मंडळींना सुद्धा उन्हातान्हातून दररोज तीस किमी चालणं सोपं नव्हतं. पाय थकायचे , उन्हाचा तडाखा नको वाटायचा, आपलं शहरातलं एसी च्या सुखातलं आयुष्य सोडून आपण हे काय करतोय असे प्रश्नही मनात यायचे. मग अनवाणी पंढरपूरकडे निघालेले एखादे महाराज दिसायचे, ३५ वर्ष-पन्नास वर्ष वारे करणारे वारकरी दिसायचे, त्यांच्या मनातली भक्ती मनाला भिडायची आणि वाटायचं आपल्याला एखाद वर्ष सुद्धा हा प्रवास अनुभवता येऊ नये का? वर्षानुवर्षे अशी वारी करणाऱ्या ह्या मंडळींना कंटाळा, थकवा येत नसेल का असाही प्रश्न मनात यायचा. थकवा आला तरी माऊलीच्या भेटीची आस अशी असायची कि त्या थकव्यावर मात करून पाऊलं पंढरीची वाट धरायची.
सकाळी साधारणतः सहा वाजता चालायला सुरुवात करायची. सकाळीच चालत चालत हरिपाठ म्हणायचा आणि साधारणतः नऊ वाजेपर्यंत पहिला टप्पा गाठायचा. हरी पाठाच्या पठणाने सकाळ अगदी प्रसन्न आणि भक्तिमय होऊन जायची. हरिपाठाचा गोडवा आणि भक्तीचं , नामस्मरणाचं महत्व अगदी सोप्या शब्दात मांडण्याची हातोटी मनाला भावली नाही तरच नवल. नऊच्या दरम्यान नाश्ता करून मग पुढची वाटचाल सुरु व्हायची. हा टप्पा थोडा त्रासदायक वाटायचा कारण ह्या वेळी उन्हाचा तडाखा जाणवायला लागायचा. वेळोवेळी पाणी पिण्यासाठी, घाम पुसण्यासाठी थांबावं लागायचं. पण एकमेकांच्या सोबतीने गप्पा मारत, चर्चा करत,विठ्ठलाचं नाव घेत हीही वाटचाल पूर्ण व्हायची. दुपारच्या जेवणाची व्यवस्था कधी शाळेत, कधी एखाद्या संस्थेचे, कधी एखाद्या स्नेह्यांच्या घरी अशी असायची. सगळीच मंडळी अतिशय प्रेमाने, आदराने खाऊ घालायची. पंढरपूर ला पायी चाललो म्हणून सर्वच मंडळी आदरही करायची. ह्या आदराला आपण पात्र नाही ह्याची जाणीव आम्ही मनात सतत ठेऊन होतो. दुपारच्या जेवणानंतर मात्र थोडा आराम. आणि मग साडेचार पाचच्या दरम्यान पुन्हा मार्गक्रमण. उन्ह कलायला लागली कि वातावरण थोडं प्रसन्न होतं , वारे वाहायला लागतात, मावळतीचे रंग आकाशात दिसायला लागतात. अशा ह्या कातरवेळी विठठ्ल भक्तीने मन भरून येतं . उस्त्फुर्तपणे अभंगांच्या ओली ओठांवर येतात आणि पावलं पंढरीच्या दिशेने चालत राहतात. रात्री मुक्कामी पोचल्यावर पाय दुखत असले, दमायला झालं असलं तरी एवढी वाटचाल केल्याचं समाधानही असायचं मनात. म्हणता म्हणता पंढरपूर जवळ यायला लागतं . वेळापुरात पोचलं कि पंढरपूर मनात घर करून राहतं . वेळापुरातल्या अतिशय सुंदर अर्धनारीनटेश्वर मंदिराच्या नंतर मग एकदम विठ्ठल रुख्मिणी मंदिर. पंढपूरच्या जवळ वाखरी गाव आहे, इथून वारकऱ्यांचा धावा सुरु होतो. आम्हीही वाखरीपासून न थांबता सलग पंढरपुरात जायचं ठरवलं. जून महिन्यातल्या तळपत्या उन्हात श्रीक्षेत्र पंढरपुरात प्रवेश केला.

वाखरीपासून आकाशातही विठठ्लची प्रतिमा दिसायला लागली होती. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात सावल्या विठूच्या दर्शनाने, याचसाठी केला होता अट्टाहास असं मनात आल्याशिवाय राहत नाही. विठू माऊलीच्या दर्शनाने, पदस्पर्शाने आठ दिवसात केलेली सगळी वाटचाल कारणी लागल्याची खात्री पटते. मन भरून येतं , डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात. शेकडो वर्षांच्या वारकरी परंपरेशी आपला धागा त्या क्षणाला जुळतो. वर्षानुवर्षे महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर वाहणारा हा भक्तिसागर किती अथांग आहे ह्याची जाणीव मनाला होते. महाराष्ट्र भूमीतल्या प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जाणारी हि वारकरी परंपरा रुजवणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, त्यावर कळस चढवणारे संत तुकाराम, वारकरी परंपरेचा प्रचार आणि प्रसार पार पंजाब पर्यंत करणारे नामदेव, सावता माळी, जनाबाई,गोरा कुंभार अशी थोर संतपरंपरा डोळ्यांसमोर उभी राहते. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं प्रेमाने म्हणणारा सावता माळी असो किंवा झाडलोट करी जनी , पाणी भरी चक्रपाणी असं म्हणणारी जनाबाई असो. विठ्ठलाची वेगेवेगळी रूपं ह्या संतजनांनी अनुभवली आणि अतिशय गोड शब्दात ती आपल्यापर्यंत पोचवली. मराठी वाङ्मयाला वारकरी परंपरेने अधिक समृद्ध केलं. कर्नाटकात झाले तसे शैव वैष्णव झगडे महाराष्ट्रात फार झाले नाहीत. महाराष्ट्राने विठ्ठलाचं रूप स्वीकारलं आणि एक महासमन्वय साधला. पुढची अनेक वर्ष महाराष्ट्राला ह्या परंपरेने समृद्ध केलं. आळंदी ते पंढरपूर वाटचालीत ह्या परंपरेचा काही अंश अनुभवता आला हेच माझं भाग्य.