Wednesday, 9 December 2020

उरलेल्या फराळाचे भुस्कट





अलीकडेच दिवाळी होऊन गेली. दिवाळी म्हटली कि फराळ हा होणारच . फराळाची देवाणघेवाणही होणार.  दिवाळीच्या दिवसात उत्साहाने फराळ खाल्ला जातो . पण  लवकरच त्या गोडधोडाचा कंटाळा येतो . मग घरातल्या डब्यांमध्ये चिवड्याचा चुरा, चकलीचे तुकडे, रव्याचे  फुटलेले लाडू, बेसनाचे बसके लाडू, अर्ध्या मुर्ध्या करंज्या दिसायला लागतात. घरातली कोणी मंडळी त्याकडे पाहायला तयार नसतात. मेहेनतीने केलेल्या ह्या गोष्टी टाकवत  पण नाहीत . कोणा भिकाऱ्याला देण्याइतक्या त्या गोष्टी धड नसतात . विनाकारण डबे अडकून पडतात. डब्यातून आपल्याकडे त्या गोष्टी सतत बघत राहतात आणि आपणही  काय करावं ह्या चिंतेत राहतो. 

माझ्यावरही हि वेळ आलीच ह्यावर्षी . आजकाल   गुगलशिवाय कुठच्या गोष्टीचं पान हलत नाही  पूर्वी कसं माहीतगार व्यक्तीला विचारायचं, जुनी पुस्तकं किंवा दस्तऐवज पाहायचे असे पर्याय होते. आता मात्र फक्त टाईप करायचं कि गुगल  माहितीचा सगळा खजिनाच आपल्यासमोर ठेवणार,. वाचा जेवढं जमेल आणि झेपेल तेवढं . मी पण बघूया काय मिळतंय का म्हणून वेगेवेगळ्या प्रकारे गुगल सर्च करून पाहिला. उरलेला फराळ , उरलेल्या रव्याच्या लाडवांचं काय करावं असे सर्च करून पाहिले . दिवाळी फराळ एवढं टाईप केलं कि फराळाच्या पाककृतींपासून ते फोटोंपर्यंत सगळं मिळतं .  उरलेला दिवाळी फराळ म्हटल्यावरही गुगलने बऱ्यापैकी गोष्टी शोधल्या . म्हणजे बेसनाचे लाडू उरले असतील तर त्याचा चुरा भरून पुरणपोळीसारख्या पोळ्या  किंवा गोड बुंदी उरली असेल तर दुधात घालून त्याची खीर असे पर्याय दिसले. दिवाळीत माव्याच्या मिठाया देण्याची पण पद्धत आहे देशातल्या काही भागात .  अशा मिठाया दुधात आटवून त्याची कुल्फी इत्यादी करण्याचे पर्याय पण दिसले . पण दिवाळीचा फराळ करूनच कंटाळलेल्या आणि स्वयंपाकघरात वेळ घालवण्याचा उत्साह नसलेल्या माणसांना हे पर्याय जरा कठीणच . कारण हे पर्यायही काही कमी वेळखाऊ नाहीत.  उरलेल्या फराळाचं काय करायचं ह्या विषयावरचा गुगलचा माहिती साठा मर्यादित होता . त्यामुळे मग आम्हाला आमचं डोकं चालवावं लागलं . 

सुरुवात रव्याच्या बिनपाकाच्या लाडूंपासून केली. हा अगदी सोपा उपाय . लाडू फोडायचे. आधीच फुटलेले असतील तर  वेळ वाचलाच म्हणायचा. हे लाडू कढईत घालायचे वरून हळूहळू थोडं दूध घालायचं रवा फुलतो . मग थोड्याच वेळात आपल्या पसंतीनुसार रव्याची खीर किंवा शिरा तयार. अगदी कमीतकमी वेळात लाडवांचं रिसायकलिंग





चकली हा पदार्थ उरू शकतो ह्यावर माझा विश्वास नाही . पण कडक,चिवट,मऊ इत्यादी प्रकारातली चकली उरली असेल तर त्याचा चुरा अनेक प्रकारे खपवता येईल . दिवाळी झाली कि घरातल्या मंडळींना चमचमीत मिसळीचं आमीष दाखवायचं . उरलेला चिवडा किंवा चकलीचा चुरा मिसळीत सहज मिसळून जातो. आणि मिसळीला कुरकुरीतपणा पण येतो.  चकलीचा चुरा मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक करायचा आणि कधी कटलेट करायचं असेल किंवा बर्गर करायचा असेल तर त्याच्या पॅटी साठी घोळवायला हा चुरा उपयोगी पडतो. ब्रेड क्रम्स ना पर्याय हो. हा चुरा उपम्यावर किंवा पोह्यांवर  घालता येईल. उपम्याला किंवा पोह्यांना कुरकुरीतपणा येईल. चकलीचा चुरा किंवा छोटे तुकडे दह्यात घालून खाण्याचा पर्याय मला गुगल सर्च मध्ये मिळाला . उरलेला चिवडा मूगडाळ तांदूळाच्या खिचडीत सहजच खपेल. खपवण्याबद्दल कोणाकडे वाच्यता करायची नाही. पोहे तांदूळापासून बनवलेले असतात. खिचडीच्या माध्यमातून ते पुनश्च भातात जाऊन मिळणार . समेवर परत येण्यासारखाच प्रकार हा. शंकरपाळ्यांचा चुरा उरला असेल आणि घरात लहान मुलं असतील तर एक प्रयोग करून पाहता येईल. घरात जर चॉकोलेट सिरप असेल तर शंकरपाळ्यांच्या चुऱ्यात थोडंसं चॉकोलेट सिरप घालून छोटे छोटे लाडू करता येतील . चॉकोलेट सिरप दाट असलं पाहिजे. हर्शी सिरप सारखं . 
दिवाळी फराळ रिसायकलिंग ह्या विषयात विचार करायला किंवा आपली सृजनशीलता दाखवायला बराच वाव आहे  . पण सृजनशीलता दाखवताना गाजावाजा करू नये. आधी करावे मग सांगावे हा बाणा ठेवणं उत्तम.फोटो काढणं हे पण महत्वाचं आहे बरं . आजकाल सोशल मीडियाचा प्रभाव सगळ्यांवरच आहे त्यामुळे रिसायकलिंग कितीही उत्तम आणि बेमालूम जमलं तरी त्याचं सादरीकरण पण जमलं पाहिजे. किंबहुना रिसायकलिंग थोडं फसलं पण फोटो छान आले तर खूप लोक ते फोटो बघणार. पदार्थ कसा जमला हे बघायला किंवा चाखायला कोण येतंय. सगळा डिजिटल मामला. आपले अनुभव फोटोसहित शेअर करायला विसरू नका . आपल्या अनुभवांचा इतरांना फायदा व्हायला नको का! 

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...