Wednesday, 26 June 2019

हौसेची वाळवणं


या पोस्टचं शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं का? शक्य आहे आश्चर्य वाटणं. कारण उन्हाळ्यातली वाळवणं , पापड कुरडया ह्या शीर्षकांचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही. पण हौसेची वाळवणं हा जरा वेगळाच शब्द प्रयोग वाटू शकतो. सरळ सांगायचं झालं तर हौस म्हणून केलेली वाळवणं ती माझी हौसेची वाळवणं. मी दिल्लीसारख्या महानगरात राहाते, माझं बरचसं आयुष्य मुंबईसारख्या महानगरात गेलं , मी सरकारी अधिकारी आहे , नोकरी करणाऱ्या यच्चयावत बायकांची जी तारेवरची कसरत सतत सुरु असते त्याला मी अपवाद नाही. दुसरीतल्या मुलीचा गृहपाठ घेण्यापासून ते लोकसभा प्रश्नाच  उत्तर तयार करण्यापर्यंत सर्व आघाड्यांवर लढा सुरु असतो. मुंबईतल्या फ्लॅटमध्ये वाळवण वगैरेचा विचारही अशक्य होता. दुकानातून पापड,कुरडया विकत घेणे एवढंच माहीत होतं. मी बदली होऊन दिल्लीत आले आणि मोठी गच्ची असणारं घर मला मिळालं . 
         दिल्लीत उन्हाची काही कमतरता नाही. वर्षातले सहा महिने इथे उन्हाळाच. मे आणि जून तर अती कडक उन्हाळा . अमराठी प्रांतात राहात असल्यामुळे खास मराठी वस्तू इथे मिळत नाहीत. मग आपण महाराष्ट्रात जाऊ किंवा कोणी तिकडून इकडे येणार असेल तर आठवणीने कुरडया, चिकवड्या,पुरणपोळ्या अशा गोष्टी आणायच्या. एक दिवस मनात आलं थोडे प्रयोग करूया का उन्हातल्या वाळवणांचे . लहानपणी आजूबाजूच्या काकू, मावशी किंवा गावातल्या आजी पापड वगैरे करायच्या. त्यांना हरकाम्याची गरज असायची. हे हरकाम्याचं काम केलेलं होतं . पापड वाळत घालण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद पसर , त्या कागदावर विटेच किंवा दगडाचं वजन ठेव, पापड घातल्यावर त्याच्यावर पातळ साडीचं किंवा धोतराचं आच्छादन घाल, शेजारच्या काकूंकडून पोळपाट लाटणं आण अशा छोट्या मोठ्या कामांवर आम्हा लहान मुलांना पिटाळलं जायचं . पण वाळवणांचा फर्स्ट हॅन्ड अनुभव कधी घेतला नव्हता. 
        आमच्या पिढीचा एक महत्वाचा मार्गदर्शक म्हणजे गूगल आणि युट्युब . तिथे बराच खजिना मिळालाच. त्याहीपेक्षा विश्वासार्ह सोर्स म्हणजे आई, मावशी, काकू इत्यादी. त्यांनाही कन्सल्ट केलं . त्यातल्या अनेकींनी सरळ म्हटलं कशाला हवेत हे उद्योग. इथे मुंबईत येशील तेव्हा घेऊन जा हवे तेवढे. पण मी ऐकलं नाही. आणि वाळवणाचे काही यशस्वी प्रयोग केले. 
     सुरुवात केली मिश्र डाळींच्या सांडग्यांपासून. ह्याला कोणी वडी म्हणतात, कोणी करोडया म्हणतात. दिल्लीत किरणासामान मिळणाऱ्या बहुतेक दुकानांमध्ये ह्या वड्याही विकायला असतात. खानदेशातल्या मैत्रिणींनी सांगितलं की ह्या कुरोड्या रसाबरोबर खाल्या जातात. एरवीही भाजी नसेल घरात तर ह्या कुरोड्यांची रस्सावाली भाजी करता येते. उडीद डाळ, चणा डाळ, तूर डाळ,मूग डाळ ह्या डाळी रात्रभर भिजत घातल्या. सकाळी थोड्या जाडसर वाटून घेतल्या,त्यात तिखट मीठ हळद, धने जिरे पावडर घातलं. आणि चमच्याने छोट्या वड्या घातल्या. दिल्लीच्या कडक उन्हाळ्यात तीन दिवसात मस्त वाळतात. हौसेचेच असल्यामुळे थोडेच केले. ताटभर करायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. नोकरी इत्यादी सांभाळून मी असले उद्योग करते ह्याचं माझ्या मैत्रीणीना कौतुक. मग त्यांच्याकडे भाव खाण्यासाठी हा हौसेचा वाटा त्यांनाही थोडा दिला जातो. 


 दुसरा प्रयोग झाला साबुदाण्याच्या चिकवड्या किंवा पापड्यांचा. साबुदाणा रात्रभर भिजत घालायचा. सकाळी मीठ,जिरे घालून घट्टसर शिजवायचा आणि पळीने छोट्या पापड्या घालायच्या. सुट्टीच्या दिवशी समजा हा उद्योग केला तर मग अर्धवट वाळलेल्या चिकवड्या गट्ट करण्याचा आनंदही घेता येतो. ह्या सुद्धा तीन चार दिवसात चांगल्या वाळतात. 

याच हौसेच्या काळात एका मैत्रिणीकडे जेवायला जायचा योग आला. तिच्याकडे नुकताच गावाहून पापड, लोणची असा सगळा साठा आला होता. त्यात थोडा जाडसर रव्याचा पापड होता. तिच्या बोलण्यातून कळलं की हे पापड सुद्धा पटकन होतात. लगेच युट्युब सर्च करून. दुसऱ्या दिवशी प्रयोग झाला पण. एक वाटी रवा असेल तर साधारण ७ ते ८ वाट्या पाणी घेऊन त्याला उकळी येऊ द्यायची. मग त्यात मीठ आणि जिरं घालायचं आणि राव घालून ढवळत राहायचं. रवा पटापट शिजतो. त्यात गुठळी होऊ द्यायची नाही. साधारण घट्ट झालं की पळीने छोटे पापड घालायचे. हे पापड जाडसर असतात त्यामुळे वाळायला वेळ लागतो. तरी ५-६ दिवसात होतात.  
दिल्लीच्या माझ्या घराच्या गच्चीवर एक आंब्याचं झाड येऊन पोचलेलं आहे. त्यावर लागलेल्या कैऱ्या पाहून छुन्दा करावा असा विचार आला. छुन्दा ही गुजराती मंडळींची खासियत. त्यामुळे सुरतेला राहणाऱ्या मावशीला फोनवर लगेच कन्सल्ट केलं. जाड किसणीने कैऱ्या किसल्या, त्यात साखर, मीठ,लाल तिखट आणि थोड्या लवंगा टाकल्या. हे सगळं मिश्रण काचेच्या बाटलीत भरून त्याला दादरा बांधून ८ दिवस उन्हात ठेवलं. माझ्या मुलींना दादरा हा शब्द माहीतच नाही. लोणची, मसाले काचेच्या भरण्यात भरतात तेव्हा त्या बरण्यांची झाकणं घट्ट राहावीत आणि त्या बरण्या हवाबंद व्हाव्यात म्हणून हा दादरा बांधला जायचा. आता सर्रास  मिळतात तसे एअर टाईट डबे पूर्वी मिळायचे नाहीत . तेव्हाचा हा घरगुती पण बेस्ट उपाय. 

तर ह्यावर्षीच्या उन्हाळ्यात हे छोटे छोटे वाळवणाचे प्रयोग मी केले. ह्यातल्या सगळ्या गोष्टी आता विकत मिळतात. मग कशाला करत बसायच्या? ह्या प्रश्नाच माझ्यापुरतं उत्तर आहे, हौस म्हणून. ही वाळवणं हे एका अर्थी आपलं सांस्कृतिक संचित आहे. वर्षानुवर्षांपासून चालत आलेल्या आपल्या खाद्यसंस्कृतीचं प्रतिबिंब ह्या वाळवणांमध्ये आहे. जेव्हा घराबाहेर खाण्याचे पर्याय माहीतच नव्हते तेव्हा रोजच्या जेवणाला चटकपणा आणण्यासाठी पापड,कुरडया तळल्या जात असतील. धो पावसाच्या दिवसात घरात भाजीपाला आणता येत नसेल तेव्हा सांडग्याची किंवा वडीची भाजी होत असेल. उपासाच्या खाण्याला रंगत यावी म्हणून बटाट्याचे पापड,साबुदाण्याचे पापड तळले जात असतील. प्रत्येक प्रदेशातल्या वाळवणांमध्ये तिथे पिकणाऱ्या वस्तू वापरल्या जात असणार. वर्षभरासाठी पापड, कुरडया करायच्या म्हणजे खूपच काम. आजूबाजूच्या महिला मंडळाचा सहभाग असल्याशिवाय हे शक्य होत नसणार. मग पापड लाटण्याच्या निमित्ताने, गव्हले पाडण्याच्या निमित्ताने चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलल्या जात असणार. एकमेकींच्या घरी बायकांचं जाणं येणं होत असणार. अशा ह्या वाळवणांवर लोकगीतं , लोककथा ह्यातूनच निर्माण झाल्या असणार. हे सगळं संचित टिकवायचा माझा हा छोटासा हौसेचा प्रयत्न. 




अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...