जागतिक महिला दिन आता येऊ घातला आहे. महिला दिनाचाही गेल्या काही वर्षांपासून एक उत्सव झाला आहे. बायका आणि काही प्रमाणात पुरुषही हा उत्सव आपापल्या पद्धतीनुसार साजरा करत असतात. महिला दिनाच्या कार्यक्रमांची सगळीकडे रेलचेल असते. कुठे महिलांचे सत्कार,कुठे महिलांच्या विषयांवरचे व्याख्यान,परिसंवाद,चर्चासत्र!वर्तमानपत्रांमधून खास लेख,काही वर्तमानपत्रांची तर विशेष महिला पुरवणी, मोठाल्या मॉल्समधून महिलांच्या वापरातल्या वस्तूंवर विशेष सूट असा भरगच्च महिला दिन गेल्या काही वर्षांपासून आपण अनुभवतो आहोत. महिला दिनाच्या दिवशी व्हॉट्सअँप वर तर महिलांच्या थोरपणाबद्दलच्या मेसेजेसचा वर्षाव होईल. महिला दिनाच्या शुभेछा देणार्या मेसेजेसनी फोनची मेमरी संपून जाईल. एरवी उठल्या सुटल्या महिलांची खिल्ली उडवणारे , महिलांवरचे जोक्स उत्साहाने फॉरवर्ड करणारे पुरुषही या दिवशी महिला दिनाच्या शुभेछा पाठवतात निर्लज्जपणे. बायका एकमेकींना महिला दिनाच्या शुभेछा देतात. पुरुषही उगाच आपण स्त्रीविरोधी वाटायला नको या धास्तीने ऑफिसातल्या बायकांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतात. काही पुरुष तर आज काय तुमचाच दिवस आहे अशा कॉमेंटही जोडतात सोबत.
या सगळ्या गर्दीत एक आणखी ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून
"बायकाप्रिय " झाला आहे. हा ट्रेंड मुख्यतः ऑफिसातल्या बायकांमध्ये प्रिय आहे तो म्हणजे महिला दिनानिमित्ताने ठेवणीतले कपडे/साड्या घालून ऑफिसला जायचं, छान कपड्यांमध्ये फोटो काढायचे ते महिला दिन सेलिब्रेशन म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध करायचे, झालच तर एखादा केक कापायचा, फक्त बायकांनी जेवायला बाहेर जायच किंवा ऑफिसात छोटीशी पार्टी करायची किंवा पिक्चर बघायला जायचं. आता तुम्ही म्हणाल ठीक आहे की एखादा दिवस बायकांनी मौजमजा केली तर कुठे बिघडलं. बायकांनी आणि त्यातही फक्त बायकांनी एकत्र येऊन मौजमजा केली तर चांगलंच आहे. काहीच चुकीचं नाही. पण मला पडणारा प्रश्न हा आहे की मनासारखी मौजमजा करायला महिला दिनाचा कृत्रिम आधार, लटक निमित्त कशाला पाहिजे आपल्याला? आपल्याला थोडा वेळ स्वतंत्रपणे हवा आहे अस आपण आजही स्वताकडे मान्य करू शकत नाही का? आपल्या परिवाराला आपण हे समजावू शकत नाही का की कधीतरी आपल्याला फक्त मैत्रिणींबरोबर फिरायला जायला, जेवायला जायला आवडेल. महिला दिनही आपण जर शोभेच्या बाहुल्या होऊन इतर उत्सवांसारखा साजरा करणार असू तर मग त्या महिला दिनाचं औचित्य काय राहिल? एक दिवस महिला दिन म्हणून साजरा करायचा आणि बाकी सगळे दिवस आपल्या परंपरागत भूमिका निभावत राहायच ही आपणच स्वतःची करत असलेली फसवणूक नाही का? आपण नटूनथटून येणार,फोटो बिटो काढणार, आपल्या आजूबाजूचे बरेचसे पुरुष म्हणणार आजचा दिवस ह्यांचा ! आपण खरंच यातून काही साध्य करतो आहोत का? नटायलाथटायला,
फोटो काढायला,जेवायला बाहेर जायला कारण कशाला पाहिजे आपल्याला? आणि तेही महिला दिनाचं?की आपण इतका विचारच करत नाही? इतर बायका म्हणतात म्हणून आपणही त्या प्रवाहात वाहायला लागतो? एक महिला दिन साजरा करण हे आपल उद्दिष्ट आहे की आपल्यावर कुठचाही अन्याय न होता आपल्या सगळ्या क्षमता प्रभावीपणे वापरता येणं हे आपलं उद्दिष्ट आहे? महिला दिन साजरा केल्यामुळे आपल्या परिस्थितीत काही चांगले बदल होणार आहेत का? महिलांच्या एकूणच लढायांमध्ये महत्वाच्या ज्या लढाया झाल्या त्याचे आठवण, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा दिवस आपण पाळतो त्याला अस बेगडी आणि उत्सवी रूप देऊन आपण काही मिळवतो आहे का? महिला दिनाच्या निमित्ताने अधिक रचनात्मक, सकारात्मक काही करता येईल का? याचा विचार करूया आणि नुसता विचार नाही तर कृतीसुद्धा !