Monday, 26 May 2025

अमलताश

 २००२ मध्ये मी मध्य प्रदेशात पंचमढीला गेले होते. मध्य प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या "अमलताश " नावाच्या छोटेखानी हॉटेल मध्ये आम्ही राहिलो होतो. "अमलताश हे नाव ऐकायला फारच छान होतं . पण तेव्हा अमलताश म्हणजे नक्की काय हे माहीतच नव्हतं. हिंदी भाषक प्रदेशाशी तेव्हा माझा संबंध कमीच होता. अमलताश म्हणजे काय हे विचारल्यावर कळलं कि हे उन्हाळ्यात पिवळी जर्द फुलं येणारं झाड आहे. २००२ मध्ये गुगल ची सोय नव्हती. कि पटकन टाईप करावं आणि विचारावं, अमलताश ला मराठीत काय म्हणतात. पण त्या हॉटेलच्या परिसरात एक अमलताश झाड आहे अशी माहिती तिथल्या माणसाने दिली. पिवळ्या फुलांनी लगडलेलं ते झाड पाहिल्यावर लक्षात आलं कि हा तर मराठीतला बहावा. 



नवी दिल्लीत  जवळपास सर्वच महत्वाच्या रस्त्यांवर  बहावा फुललेला पाहायला मिळतो . मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अमलताश फुलायला लागतो. त्याची पिवळी जर्द फुलं आणि पोपटी हिरवी पानं हि रंगसंगती दिल्लीच्या कडक उन्हाळ्यात मनाला शांती देणारी. इंडिया गेट च्या भव्य परिसरात अमलताश च्या फुलांचे पिवळे जर्द लोलक डुलताना पाहायला खूप मजा येते. इंडिया गेटमधून निघणारा एक रस्ता म्हणजे झाकीर हुसेन मार्ग, ह्या रस्त्यावरून उजव्या बाजूला सुब्रमणिया भारती मार्गावर तर अमलताश ची रांगच लागलेली आहे. त्याच्या फुलांचा सडा रस्त्याच्या डाव्या बाजूला उन्हाळ्याच्या दिवसात दिसत राहतो. चाणक्य पुरी हा दिल्लीतला डिप्लोमॅटिक एरिया. इथे अनेक देशांचे दूतावास आहेत. ह्या परिसरात मुळात परदेशात आढळणारी काही झाडं सुद्धा हमखास दिसतात. ह्या परिसरातही अधूनमधून अमलताश चा मनमोहक फुलोरा दिसत राहतो. 


दिल्लीतल्या झाडांबद्दल प्रदीप कृष्ण ह्यांनी " ट्रीज ऑफ दिल्ली " नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकात अर्थातच अमलताश बद्दल माहिती आहे. अमलताश ची फळं टणक  असतात. त्यामुळे ह्या झाडाच्या बियांचा प्रसार होऊन त्यांची संख्या  वाढवण्यात कोल्हा , अस्वल ह्या प्राण्यांची  मोठी भूमिका असते.  कोल्ह्यांना ह्या फळातला रस आवडतो. 



अमलताश चे काही फायदे मला भोपाळ जवळच्या रातापानी ह्या व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना ऐकायला मिळाले. रातापानी च्या जंगलात खूप अमलताश बघायला मिळाले. माझ्या बरोबर आलेल्या फॉरेस्ट गार्ड ने मला सांगितलं कि मध्य प्रांतातले आदिवासी अमलताश ची फुलं खातात . वर्षातून एकदा तरी अमलताश च्या फुलांची भाजी खाल्लीच जाते ह्याचा पोट साफ राहण्यासाठी उपयोग होतो. अमलताश च्या शेंगेबद्दल एक गमतीशीर गोष्ट त्याने मला सांगितली. अमलताश ची जी शेंग  असते ती गादी किंवा अंथरुणाखाली ठेवली तर ढेकूण होत नाहीत. रातापानी च्या सुकलेल्या जंगलात कडक उन्हाळ्यात अधूनमधून फुललेले अमलताश पाहून डोळ्यांना खूपच आराम मिळत होता. एके ठिकाणी अमलताश च्या फुलांचा फोटो काढायला आम्ही जिप्सी थांबवायला सांगितली तर त्या फॉरेस्ट गार्ड ने अमलताशच्या फुलांचा  छानसा झुपका आम्हाला  काढून दिला. 



अमलताश चा भरलेला दरबार पाहायचा असेल तर मात्र दिल्लीतल्या खान मार्केट जवळच्या अमृता शेरगील मार्गावर उन्हाळ्यात गेलंच पाहिजे. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं आहेत. आणि त्यातही अमलताश खूप आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दिल्लीतल्या नकोशा वाटणाऱ्या उन्हाळ्याने तुम्ही त्रासला असाल तर जीवाला शांत करण्यासाठी अमृता शेरगील मार्गावर जरूर जा. अमृता शेरगील ह्या चित्रकार होत्या. त्यांच्या अनेक पेंटिंग्स मध्ये लाल रंगाचा मुक्त वापर दिसतो. त्यांचं नाव असलेल्या ह्या रस्त्यावर उन्हाळ्यात हिरवा आणि पिवळा रंग निसर्गाने उधळलेला असतो . एखाद्या चित्रकाराचं नाव असणारा हा रस्ता चित्रासारखाच सुंदर दिसतो . ह्या रस्त्यावरचं हे मुक्त सौंदर्य पाहूनच ह्या रस्त्याला अमृता शेरगील ह्यांचं नाव दिलं असणार ह्याची खात्री पटते. रात्रीच्या वेळी अमलताश ची पिवळी झुंबरं वाऱ्यावर डुलत राहतात आणि रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात चमकत राहतात. फुलांचा मंद सुगंध हवेत भरलेला असतो. दिल्लीतला असह्य उन्हाळा सुसह्य करण्याची ताकद अमलताश मध्ये आहे नक्कीच. 



अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...