Monday, 30 January 2017

एवढ्याशाने काय होतं ?

अलीकडे एकदा घरातले आम्ही सगळे सुट्टीत फिरायला गेलो होतो. आमची राहण्याची जागा पहिल्या  मजल्यावर होती.  प्रत्येकवेळी कुठेही जाताना किंवा बाहेरून आल्यावर बाकी लोक लिफ्टने गेले तरी मी मात्र आवर्जून जिने चढत होते आणि उतरत होते. एकदा माझ्या नवऱ्याने मला म्हटलं "एवढ्याशाने काय होतं ?" त्याला काय उत्तर द्यावं याचा मी विचार करेपर्यंत त्याच्या लिफ्टचे दार बंद झालं आणि माझाही अर्धा जिना चढून झाला. पण त्याचा प्रश्न माझया डोक्यात पिंगा घालत राहिला. जवळजवळ एक वर्षाचा काळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. ते एक वर्ष ज्यात मी जवळजवळ ८ ते ९ किलो वजन आरामात आणि आनंदात कमी करू शकले. आरामात आणि आनंदात हे दोन्ही शब्द मी जाणीवपूर्वक वापरलेले आहेत. कारण हल्ली आपल्याला सगळ्यांनाच वजन कमी करायच असत आणि प्रत्येक जण वजन कमी करण्याच्या चिंतेत काहिनाकाहीतरी करतच असतो. कोणी जिमला जातं कोणी डाएट करत. वजन कमी करण्यासाठी काय काय करावं अशा  सल्ल्याची कमतरता नाही. आपल्यातले बहुतेक जण काही काळ अशा  व्यायामाने, डाएटने झपाटलेले असतात. या प्रयत्नांचे रिजल्ट्स लगेच दिसले तर आपला उत्साह वाढतो. नाही दिसले तर अर्थातच आपल्यापैकी अनेकजण ढेपाळतात. 
तर मी गेली १० वर्ष व्यवस्थित जाड होते. ३० ते ४० या वयाच्या स्पॅनमध्ये आपली तब्येत साधारणतः उत्तमच असते त्यामुळे जाडेपणाचे विशेष त्रास आपल्याला होत नाहीत. माझयासारख्या बायकांना तर बाळंतपणं, त्यातही सिझेरियन अशी आयतीच कारण मिळतात वाढलेल वजन जस्टीफाय करण्यासाठी. वाढलेल्या वजनाचा त्रास व्हायला लागेपर्यंत आपण असेच दिवस घालवतो आणि मग अचानक पाय दुखायला लागतात, जिने चढताना धाप लागायला लागते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याच वयाची आपलीच एखादी मैत्रीण चवळीच्या शेंगेसारखी बारीक दिसते तेव्हा काय वाटत हे मी माझया मैत्रीणीना सांगायला नको. जाडीबरोबर केसही पिकायला लागले की जी काही सैरभैर अवस्था होते आपली ती फक्त आपल्यालाच माहीत. तर मीही अशीच चाळीशीच्या उंबरठ्यावर असताना यच्चयावत समवयस्क बायकांप्रमाणे जाड, केस पिकायला लागलेली होते. थोडा फिटनेस मिळवता येतो का बघूया असा विचार केला. इंटरनेटवर मिळतात त्यातला कुठचाही डाएट प्रकार आपल्याला जमणार नाही हे मला पक्कं माहीत होतं. जेवणात सूप घ्यावं सॅलड घ्यावं हे ऐकायला वाचायला आणि कोणी आयतं करून दिलं तर खायलाही छानच आहे. पण आपल्याला कोणी हे आयतं करून देणार आहे का? बिलकुल नाही. गोडाचे पदार्थ मैद्याचे पदार्थ बंद हे सुद्धा जमण्यासारखं नाहीच कारण मन मारून मारून किती दिवस मारणार? आणि ४ दिवस मन मारायचं आणि २ दिवस दुप्पट खायचं हे सुद्धा नकोच होत मला . रोजच्या रोज नित्यनेमाने जिमला जाणं हेसुद्धा कठीणच होत पण व्यायाम टाळायची इछा नव्हती. आजूबाजूला सर्व माध्यमांमध्ये खूप सल्ले होते वजन कमी कारण्याबद्दलचे. काही पाळता येणारे आणि काही अगदी भयंकर कठीण वाटणारे. सगळ्या सल्ल्यांचा एक लसावीसुद्धा निघत नव्हता. मग ठरवलं थोडे थोडे प्रयत्न करून बघूया. तर अनेक बाबतीतल्या एवढ्याशा एवढ्याशा गोष्टीनी ८ किलो जायला मोठाच हातभार लागला. उदाहरणार्थ ३ ते ४ मजल्यांपर्यंत लिफ्ट वापरायची नाही. जिने चढून आणि उतरून जायच. आता अनेकवेळा ऑफिसमधून दमून आल्यावर जिने चढायचं जीवावर येत पण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा लिफ्ट वापरायची नाही. गोष्ट छोटीशीच पण एकदा सवय लागली की आवडायला लागते. आपल्या समाजात खाणे पिणे हा  आपल्या संस्कृतीचा विशेषतः पाहुणचार करण्याच्या संकल्पनांमधला मोठा भाग आहे. पाहुणे येणार म्हणजे त्यांना जेवायलाच बोलावलं पाहिजे, पाहुणे जेवायला येणार म्हणजे गोडधोडाचा साग्रसंगीत स्वयंपाक मग खूप जेवण्याचा आग्रह. सगळा पाहुणचार अधिक खाण्यावर केंद्रित झालेला असतो. एखादा माणूस मोजकंच खाणारा असेल तर आपण लगेच कॉमेंट करणार "काय डाएटवर की काय?" . तर या अशा पद्धतींपासून मुक्ती मिळवणं महत्वाचं  आहे. आयुष्यातला आनंद हा काही खाण्यापिण्यात एकवटलेला नाही. किंबहुना खाणे पिणे ह्या गोष्टीचा जो अनाठायी वापर आपण करत असतो तो बंद करायला पाहिजे. आनंद झाला म्हणून आपण मिठाई खातो, कधी उदास वाटत चिडचिड होते तेव्हा आपण उगाचच चहा कॉफी ढोसतो नाहीतर चकली,चिवडा,फरसाण असल्या गोष्टी फस्त करतो. खाण्यापिण्याचा असा अनाठायी वापर बंद केला तरी खूप काही साध्य होत. आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयीत छोटे छोटे बदल केले तरी खूप फरक पडतो. गोड पण खायचं , सामोसा-वडा -भजी पण खायची हे काही खरं नाही. प्रत्येक गोष्ट मर्यादेत खाल्ली तरी खूप काही साध्य होत. 
फिटनेस मिळवण्याच्या वाटेवरचा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे नियमित व्यायाम. पण यातला नियमित हा शब्द अनेकवेळा आपण विसरतो. मग २ दिवस अगदी झपाटून व्यायाम करायचा आणि ४ दिवस अंग दुखत म्हणून व्यायामाला बुट्टी मारायची हा काही मार्ग नव्हे. थोडा थोडा व्यायाम रोज केलाच पाहिजे. आपल्या रोजच्या रुटीनमध्ये तासभर व्यायाम करायला वेळ मिळणं शक्यच नाही पण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा व्यायामाची संधी वाया घालवायची नाही. आणि मुख्य म्हणजे व्यायाम ही नाईलाजाने करायची गोष्ट नाही. ती  जेवढ्या आनंदाने आणि उत्साहाने आपण करू तेवढे त्याचे फायदे आपल्याला मिळतात. 
माझ्या नवऱ्याने मला जे विचारल एवढ्याशाने काय होतं ? एवढ्याशाने खूप काही होतं, रोज थोडी थोडी साय साठवली की काही दिवसांनी त्याचं सायीचं दही,ताक,लोणी आणि तूप होतं. रोज थोडी थोडी तयारी केली की दिवाळीचा सगळा फराळ तयार होतो, रोज थोडा थोडा व्यायाम केला की व्यायामाची गोडी लागते, शरीराला व्यायामाची सवय लागते, रोज थोडं थोडं खाण्यावर नियंत्रण ठेवलं तर वजनावरही नियंत्रण राहातं. रोज थोडं थोडं चाललं की चालण्याची क्षमता वाढत जाते. छोटीशी मुंगी कणकण वाहून नेते आणि मोठा साठा करते. गेल वर्षभर मीपण अशा छोट्या छोट्या गोष्टी नियमितपणे करत आले. माझ्या मनाला, शरीराला अगदी माझ्या कुटुंबियांनाही याची आता सवय झाली आहे. एक काळ असा होता की अर्धा किमी धावण्याची सुद्धा माझी क्षमता नव्हती पण व्यायामाचा भाग म्हणून मी ५ मिनिटं , १० मिनिटं अशी अधून मधून धावायला सुरुवात केली आणि आता तर सलग एक दीड तासही धावता यायला लागलंय. वजन कमी करण्याचा प्रवास हा प्रत्येकाचा सारखाच असेल असं नाही पण सगळ्यांच्या प्रवासातला छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा वाटा महत्वाचा आहे. वजन कमी करणं याहीपेक्षा सक्रिय आणि निरोगी जीवनशैली आत्मसात करणं अधिक महत्वाचं आहे. सक्रिय आणि निरोगी जीवनशैली आत्मसात करताना वजन कमी होणार यात काही शंकाच नाही. व्यायामाची, वजन कमी करण्याची प्रोसेस ही बळजबरीचा रामराम म्हणून करता कामा नये. आपल्याला त्यात आनंद वाटला पाहिजे तरच आपण त्या गोष्टी नियमितपणे करू शकतो. बघा मग करून छोट्या छोट्या गोष्टी !

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...