
छू वाघित्र्या....हे शीर्षक वाचून कोणीही चक्रावून जाईल. याचा अर्थ किंवा संदर्भ लागणं कठीणच आहे. म्हटलं तर ही एका छोट्याशा गावातली प्रथा आहे म्हटलं तर ती आपल्याला आपल्याच पूर्वजांशी एका परीने जोडणारी गोष्ट आहे. आमच्या कोकणातल्या गावात शिरण्यापूर्वी एक खिंड आहे. साधारण १०० मीटरचा भाग आहे जिथे दोन्ही बाजूला डोंगराच्या उंच भिंती आहेत आणि त्यातून जाणारा रस्ता आहे. हा उंच भिंती असलेला खिंडीचा भाग ओलांडला की गावाची हद्द सुरु होते. या खिन्डीत एके ठिकाणी सर्वसाधारण भारतातल्या कुठच्याही जंगलात, घाट रस्त्यात असतो तसा मोठा दगड उर्फ देव आहे. इथे एखादं नाणं टाकायचं, गाडीचा हॉर्न वाजवायचा आणि छू वाघीत्र्या म्हणायचं अशी प्रथा आहे. ही प्रथा बहुतेक सर्वजण प्रामाणिकपणे पाळत असतात. अनेक वर्षांपूर्वी असेल तशी ती खिंड आता भीतीदायक आणि धोकादायक राहिलेली नाही. पूर्वी असेल तितकी घनदाट झाडी आता तिथे नाही. पण आहे ती मानवी समाजाची वर्षानुवर्षे चालत आलेली नैसर्गीक प्रवृत्ती. संकटांचा सामना करण्याची हुशारी. खिंडीतला अरुंद रस्ता, दोन्ही बाजूचे उंच डोंगर, गच्च जंगल म्हणजे प्राणी आणि त्यांच्या हल्ल्याची भीती. वेळी अवेळी प्रवास करताना तर हे भीती अजूनच दाट होणार कातर झालेल्या मनांमधून. अनिश्चिततेची, अज्ञाताची भीती कायमच माणसाच्या मनाला वाटत आली आहे. त्यातून वेळोवेळी माणसांनी आपापल्या परीने मार्ग काढला आहे. ही भीती इतकी असणार की धोकादायक गोष्टीचा उल्लेखही सरळसरळ व्हायचा नाही. कोकणात सापाला किंवा नागाला कोणी साप किंवा नाग म्हटलेलं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. लांबडं असे सूचक शब्द ऐकायला मिळतील. हा वाघीत्र्या सुद्धा तसाच आहे. वाघ नाही तर वाघित्र्या. नाणं धातूचं असतं टाकलं की खणकन आवाज होणार एखादा प्राणी असेलच तर त्या आवाजाने पळून जाणार. गाडीच्या हॉर्नचं पण तसंच. आवाज केला की धोक्याची चाहूल प्राण्यांना लागणार आणि ते पळणार. आपला मार्ग सोपा होणार. एका दगडाचा देव केल्यामुळे पुढचे धोके टळले की. देवाच्या पायाशी टाकलेली ही नाणीसुद्धा फुकट जात नसणार. गावातलाच एखादा होतकरू माणूस त्याचा पैशातून त्या दगडाच्या देवापाशी तिन्हीसांजेला दिवाबत्ती करत असणार. अगदी काही नाही तर खेळासाठी बॉल घ्यायला किंवा उन्हाळ्यात थंडगार पेप्सीकोला घ्यायला तिथलीच नाणी गावातल्या मुलांच्या कामी येत असणार. दोनच शब्द छू वाघित्र्या, पण माझे विचार कुठच्या कुठे नेणारे. मलाच माझया पूर्वजांपर्यंत पोचवणारे त्यांच्याशी माझा असणारा वर्षानुवर्षांचा धागा कायम ठेवणारे !