Sunday, 18 June 2017

मोहम्मद अली रोड..भेंडी बाजार.. रमझान


मुंबईतला मोहम्मद अली रोड किंवा भेंडी बाजार सारखा परिसर माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी त्यातही ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या बाईसाठी अगदी वर्ज्यच म्हणावा असा. वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत मी कधीच इथे गेले नव्हते. माझ्या आयुष्याची बरीचशी वर्ष मी दक्षिण मुंबईतच घालवली असली तरी भेंडी बाजारला जाणं माझ्या विशलिस्टमध्ये असण्याची काही शक्यताच नव्हती. पण रमझान च्या निमित्ताने या परिसरात फेरफटका आणि खाना पिना असा कार्यक्रम वरिष्ठ पत्रकार रफिक बगदादी करणार असं मला कळलं आणि मी नागपाड्याजवळच्या सार्वी हॉटेलपाशी पोचले. नागपाडा पोलीस स्टेशनच्या जवळ जिथे क्लेअर रोड, मुंबई सेंट्रल डेपोवरून येणारा  रोड मिळतात त्या चौकात एका कोपऱ्यावर हे सार्वी हॉटेल आहे. बघून जाण्याची इच्छा व्हावी असं रूप बिलकुलच नाही. त्यात मी शाकाहारी. सादत हसन मंटो या इंडो पाकिस्तानी लेखकाचं घर इथून अगदी जवळ आहे. असं म्हणतात की मंटो इथे चहा प्यायला येत असे. राज कपूर, दिलीप कुमार असे सेलेब्रिटी इथून खास कबाब मागवत असत. पण आजच्या भाषेत या सार्वीचा यूएसपी आहे इथली मऊ रोटी. तंदूर रोटी पण एरवीचा चिवटपणा बिलकुल नाही. काहीजणांच अस म्हणणं आहे की ही रोटी गव्हाच्या कोंडयापासून बनवलेली असते. कशानेही बनवलेली असो  शाकाहारी व्यक्तीलाही इथे खायला लावण्याचा गुण या रोटीत आहे हे नक्की. 

सार्वीवरून नागपाडा पोलिसस्टेशनच्या मागच्या बाजूचा रस्ता आहे जो पुढे मोहम्मद अली रोडला लागतो त्या रस्त्यावर अनेक जुन्या बिल्डींग्ज आहेत. इथे पूर्वी मोठ्या प्रमाणावर ज्यू वस्ती होती. याच परिसरात एक सायनोगॉगही आहे. पूर्वी याच रोडवर एक कहावाच प्रसिद्ध दुकान होतं. कहावा हे सध्याच्या ग्रीन टी सारखं पेय असतं . या कहावाच्या दुकानात हुक्का सुद्धा मिळायचा. मुंबईमध्ये पूर्वी खूप ज्यू समाज होता. त्यांची आडनावंसुद्धा मराठी आडनावांसारखी असायची. हा रस्ता संपवून मुख्य रस्त्यावर उजव्या बाजूला वळलं की एक दारूचं दुकान आहे. आता तुम्ही म्हणाल की दारूचं दुकान आहे यात काय विशेष? विशेष असं की या दुकानाच्या नंतर उजवीकडे म्हणजे अगदी व्हीटी परिसरापर्यंत आणि डावीकडे जवळ जवळ लालबागपर्यंत दारूचं दुकान नाही. मुसलमान वस्ती जास्त असल्यामुळे इथे दारूचं दुकान नाही. 
या रस्त्याला एकदा आपण लागलो की city never sleeps हे मुंबईच वर्णन अगदी खास अनुभवाला येतं. हा सगळा वेगवेगळ्या मार्केट्सचा परिसर आहे. भायखळ्याचं भाजी आणि फळं मार्केट, पूर्वीच्या केळ्याच्या वखारी जिथे सध्या आंबे आहेत, बाकी अनेक गोष्टींची शेकड्याने दुकानं आहेत, मनगटी घड्याळं, मुस्लिम समाज वापरत असलेले कपडे, बायकांचे बुरखे,अत्तरं. रात्री १२ वाजता सुद्धा हा परिसर धो वाहत होता. अशा  वाहनांच्या,माणसांच्या कोलाहलातही रस्त्याच्या कडेला शांत झोपलेले अनेक मजूर लोक होते. रमजान स्पेशल फेरफटका करण्यापुरताच माझा या जगाशी संबंध आलेला. इथून चालताना सुद्धा मला कठीण जात होतं. इथले हे मजूर वर्षानुवर्षं असंच कष्टाचं आयुष्य जगत असतील. येणार प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी कष्ट आणि किमान पोटभर जेवण्याची अपेक्षा घेऊन येत असेल. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत असतील का माहीत नाही पण दिवस असाच रस्त्याच्या कडेला एखाद्या हातगाडीवर किंवा रस्त्याच्या कडेला प्लास्टिक पसरून आडवं होऊन संपत असेल. "तू कशाला तिकडे जातेस, तिथे रस्त्यावरचे लोक आपल्यासारख्या माणसांकडे डोळे फाडून पाहात असतात" असं कोणीतरी मला म्हणालं होतं  त्याची चरचरीत आठवण ह्या लोकांना पाहिल्यावर मला झाली. बघतील नाहीतर काय? वर्षातून एखाद्याच रमझान महिन्यात आमच्यासारखी पांढरपेशा समाजाची माणसं रात्री तिथे जात असणार. आमचे कपडे आमचं बोलणं आमचं वागणं सगळंच वेगळं त्यांच्यासाठी. रात्री अपरात्री अशा गर्दीत कोणी फिरायला आणि खायला येतं याची त्यांना गम्मत वाटत असेल का? आमच्या सुखासीन आयष्याचा त्यांना हेवा वाटत असेल का असे विचार करत करत मी बोहरी समाज जास्त प्रमाणात आहे अशा परिसरात पोचले होते. हा परिसर इतर परिसरापेक्षा कमी गजबजलेला, तुलनेने स्वच्छ आणि व्यवस्थित. इथलं ताज आइस्क्रीम प्रसिद्ध आहे. तवक्कल हे मिठाईचं दुकानही प्रसिद्ध आहे. 
साधी फिरनी,केशर फिरनी,मँगो फिरनी, मालपुवा,रबडी असे अनेक खास गोड पदार्थ इथे चाखलेच पाहिजेत. 


इथून पुढे आम्ही रस्ता ओलांडून "मुगल" परिसरात गेलो. इथे शिया आणि सुनी वस्ती जास्त आहे. इथल्याच एका गल्लीत निळी मशीद आहे. मुघल मशीद म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. जगभरात विशेषतः सेंट्रल आशियाई देशांमध्ये निळ्या रंगाचे काचकाम असणाऱ्या अनेक मशिदी दिसतात. भेंडी बाजार परिसरातली ही मशीद १८६० मध्ये एका इराणी व्यापाऱ्याने बांधली असं मला गुगलवरून कळलं. याच मशिदीच्या जवळ एक हमाम आहे. मला तर हा हमाम शब्द फक्त ऐकूनच माहीत होता. कधी पाहण्याची वेळ आलेलीच नाही. ह्या हमामचा वापर फक्त १५० रुपयात करता येतो असं तिथल्या गार्डने आम्हाला सांगितलं. त्याच्याच शब्दात सांगायचं तर "अभी पहले जैसे लोग आते नहीं फिर भी चल रहा हैं " आत जाऊन पाहण्याची सोय नव्हती कारण इथे फक्त मुस्लिम समाजाची माणसं जाऊ शकतात. 




इथूनच जवळ आणखी एक दुकान पाहिलं जे वर्षातून एकदाच उघडतं, नवरोजला. इथला बक्लावा हा केकसारखा पदार्थ प्रसिद्ध आहे.  ह्या दुकानाच्या निमित्ताने नवरोज काय आहे हे मला कळलं. मला असंच वाटायचं की नवरोज हा पारशी समाजाचा सण आहे. पण तसं नाही. २१ मार्चला नवरोज असतो. हा नवरोज म्हणजे पर्शियन नववर्ष. आमच्या बरोबर असणाऱ्या एका पत्रकाराने अगदी सोप्या शब्दात या नवरोजबद्दल मला सांगितलं पर्शियन नववर्ष मानणारे समाज हा नवरोज साजरा करतात. मुस्लिम आणि पारशी सुद्धा. 


रमजानच्या निमित्ताने या परिसरात खायला प्यायला जायचा मोठा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून मुंबईत रुळला आहे. म्हटलं तर मी या ट्रेण्डचा भाग आहे म्हटलं तर नाही. नाही अशासाठी कारण इथे शौकीन लोक चिकन, मटणाचे  मुघल पद्धतीचे पदार्थ खायला येतात. मी तर शाकाहारी. पण इथल्या मिठाया सुद्धा तितक्याच तोंडाला पाणी आणणाऱ्या आहेत. 
इथल्या गल्ली बोळांमधून एक अखंड प्रवाह वाहतो आहे. इथे गच्च वस्ती आहे. कष्ट आहेत. शिक्षणाचा अभाव आहे. अस्वच्छता आहे. पण या सगळ्याला एक जबरदस्त जिवंतपणा आहे. वहातेपणा आहे. इथे कुठच्या कोपऱ्यात काय व्यवसाय चालत असतील आणि किती उलाढाली होता असतील याचा विचारही मला करता येणार नाही. इथला डोंगरी भाग तर पांढरपेशा समाजाला अंडरवल्डच्या डॉंन लोकांचा म्हणूनच माहीत असतो. माझ्या विश्वातल्या माणसांना तर आश्चर्यच वाटतं की घरात मांसाहारी जेवण शिजतं तेव्हा वासाने हैराण होणारी बाई रामजणामध्ये भेंडी बाजारात कशी काय जाऊ शकते. जाऊ शकते याचं एकमेव कारण म्हणजे इथला अखंड झरणारा जीवन प्रवाह. जगण्यासाठी माणूस काय काय करत असतो हे इथे पाहायला मिळतं. कमी शिक्षित समाजाचे उत्सव कसे वेगळ्याच उत्साहाने साजरे होतात हे इथे अनुभवायला मिळतं. इथे मिळणाऱ्या रंगीबेरंगी बांगड्या, कलाकुसरवाल्या टोप्या मला जाणीव करून देतात जीवनेच्छेनें रसरसलेल्या माणसांची, त्यांच्या उत्साहाची, अथक कष्टांची. मला माहीत आहे की पुढच्या काही वर्षात हा परिसर झपाट्याने  बदलणार आहे. दाऊदी बोहरा समाजाच्या पुढाकाराने या परिसरात खूप बदल होऊ घातले आहेत. हे बदल अपरिहार्य आहेत. ह्या परिसराचा चेहेरा मोहरा बदलेल तेव्हा मी इथे अनुभवलेले रसरशीत क्षण आठवत राहातील. 








Wednesday, 7 June 2017

छू वाघित्र्या....

Image result for images of  konkan narrow roads
छू वाघित्र्या....हे शीर्षक वाचून कोणीही चक्रावून जाईल. याचा अर्थ किंवा संदर्भ लागणं कठीणच आहे. म्हटलं तर ही एका छोट्याशा गावातली प्रथा आहे म्हटलं तर ती आपल्याला आपल्याच पूर्वजांशी एका परीने जोडणारी गोष्ट आहे. आमच्या कोकणातल्या गावात शिरण्यापूर्वी एक खिंड आहे. साधारण १०० मीटरचा भाग आहे जिथे दोन्ही बाजूला डोंगराच्या उंच भिंती आहेत आणि त्यातून जाणारा रस्ता आहे. हा उंच भिंती असलेला खिंडीचा भाग ओलांडला की गावाची हद्द सुरु होते. या खिन्डीत एके ठिकाणी सर्वसाधारण भारतातल्या कुठच्याही जंगलात, घाट रस्त्यात असतो तसा मोठा दगड उर्फ देव आहे. इथे एखादं नाणं टाकायचं, गाडीचा हॉर्न वाजवायचा आणि छू वाघीत्र्या म्हणायचं अशी प्रथा आहे. ही प्रथा बहुतेक सर्वजण प्रामाणिकपणे पाळत असतात. अनेक वर्षांपूर्वी असेल तशी ती  खिंड आता भीतीदायक आणि धोकादायक राहिलेली नाही. पूर्वी असेल तितकी घनदाट झाडी आता तिथे नाही. पण आहे ती मानवी समाजाची वर्षानुवर्षे चालत आलेली नैसर्गीक प्रवृत्ती. संकटांचा सामना करण्याची हुशारी. खिंडीतला अरुंद रस्ता, दोन्ही बाजूचे उंच डोंगर, गच्च जंगल म्हणजे प्राणी आणि त्यांच्या हल्ल्याची भीती. वेळी अवेळी प्रवास करताना तर हे भीती अजूनच दाट होणार कातर झालेल्या मनांमधून. अनिश्चिततेची, अज्ञाताची भीती कायमच माणसाच्या मनाला वाटत आली आहे. त्यातून वेळोवेळी माणसांनी आपापल्या परीने मार्ग काढला आहे. ही भीती इतकी असणार की धोकादायक गोष्टीचा उल्लेखही सरळसरळ व्हायचा नाही. कोकणात सापाला किंवा नागाला कोणी साप किंवा नाग म्हटलेलं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. लांबडं  असे सूचक शब्द ऐकायला मिळतील. हा वाघीत्र्या सुद्धा तसाच आहे. वाघ नाही तर वाघित्र्या. नाणं धातूचं असतं टाकलं की खणकन आवाज होणार एखादा प्राणी असेलच तर त्या आवाजाने पळून जाणार. गाडीच्या हॉर्नचं पण तसंच. आवाज केला की धोक्याची चाहूल प्राण्यांना लागणार आणि ते पळणार. आपला मार्ग सोपा होणार. एका दगडाचा देव केल्यामुळे पुढचे धोके टळले की. देवाच्या पायाशी टाकलेली ही नाणीसुद्धा फुकट जात नसणार. गावातलाच एखादा होतकरू माणूस त्याचा पैशातून त्या दगडाच्या देवापाशी तिन्हीसांजेला दिवाबत्ती करत असणार. अगदी काही नाही तर खेळासाठी बॉल घ्यायला किंवा उन्हाळ्यात थंडगार पेप्सीकोला घ्यायला तिथलीच नाणी गावातल्या मुलांच्या कामी येत असणार. दोनच शब्द छू वाघित्र्या, पण माझे विचार कुठच्या कुठे नेणारे. मलाच माझया पूर्वजांपर्यंत पोचवणारे त्यांच्याशी माझा असणारा वर्षानुवर्षांचा धागा कायम ठेवणारे ! 

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...