कॉफी हे पेय नाही तर तो एक अनुभव आहे. चहा म्हटला की जशी तरतरी वाटते तस कॉफी म्हटली की मनात एक दरवळ पसरतो. बरिस्ता ,कॅफे कॉफी डे,स्टारबक यांचा आपल्याकडे प्रवेश होण्यापूर्वी आपल्याला काही खास निमित्ताने होणारी जायफळ घातलेली कॉफी माहित होती किंवा दक्षिण भारतीय फिल्टर कॉफी माहिती होती. कोरी कॉफी तर फक्त पोट बिघडलं तरच केली जायची. चहा जेवढ्या सर्रास प्यायला जायचा तेवढ्या सर्रास कॉफी प्यायली जायची नाही. जायफळ घातलेली कॉफी,दक्षिण भारतातली कडक फिल्टर कॉफी,परदेशातली कडक काळी एस्प्रेसो कॉफी,भारतात अनेक ठिकाणी एस्प्रेसो नावाने मिळणारी गोड दुधाळ कॉफी , कॉफी पावडर आणि साखर यांचं मिश्रण घोटून घोटून केलेली दाट कॉफी,बरिस्ता आणि तत्सम कॉफी शॉपमध्ये मिळणाऱ्या लाते,कापुचिनो ,मोका अशा कॉफीच्या सर्व अवतारांचा अनुभव १५ वर्ष चालू आहे आणि चालू रहाणार आहे. कारण कॉफी हे पेय नाही तो अनुभव आहे. A lot can happen over coffee हे ब्रीदवाक्य लिहिणाऱ्या माणसाला हे बरोबर कळलं असल पाहिजे की कॉफी हा अनुभव आहे. कधी एकट्याने घ्यायचा,कधी जोडीने घ्यायचा,गर्दीबरोबर सुद्धा घ्यायचा. धुवांधार पावसाच्या साक्षीने घ्यायचा, गुलाबी थंडीत घ्यायचा, कडाक्याच्या थंडीत घ्यायचा, काम करून कंटाळा आल्यावर घ्यायचा, काम छान जमलं म्हणून आनंद साजरा करायला घ्यायचा....
स्पर्श ,गंध ,रूप आणि चव अशा सगळ्या संवेदनांना स्पर्शणारा अनुभव म्हणजे कॉफी . कॉफीच्या बिया दळल्या जातात तेव्हाचा कडवट तरीही मनाच्या सर्व सांदी कोपऱ्यापर्यंत पोचणारा वास , दक्षिण भारतीय हॉटेलांमधून मिळणाऱ्या कॉफीचा कडू गोड वास,फिल्टरमधून झिरपणाऱ्या कॉफी डिकॉकशनचा तीव्र वास,परदेशातून आपल्याकडे आलेल्या आणि रुजलेल्या कॉफी शॉपमधल्या कॉफीचा पाश्चात्य वास. बुडबुडे असणारी फिल्टर कॉफी, दाट फेसाचं आवरण घेऊन आलेली कॉफी शॉप्समधली मऊ मुलायम कॉफी. चॉकोलेट पावडर भुरभुरवून आलेली भारतातली एस्प्रेसो कॉफी, बदामाच्या डिझाईनने सजून आलेली कॅफे कॉफी डे किंवा बरिस्तामधली कॉफी.
कॉफी असा शब्द नुसता उच्चारला तरी कस काव्यात्म वाटत. "कॉफी प्यायची का" हे ३ शब्द भावनांचे किती पदर आणि पोत घेऊन येतात. मनाच्या कुठच्या कुठच्या तारांना छेडतात. आठवणींची कितीक मोहोळ उठवतात. कॉफीसारख्याच कडू गोड आठवणी कॉफीबरोबर उसळून येतात. कॉफी एकटी येत नाही. माणसांच्या, जागेच्या आठवणी घेऊन येते. कॉफी पिण्याच्या अनुभवाचे मनावर उठलेले तरंग घेऊन येते. म्हणूनच कॉफी हे नुसत पेय नाही तो एक अनुभव आहे..परत परत घ्यावासा वाटणारा.. लोभावणारा.. झुरवणारा ...