एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि पर्यटकांच्या लिस्टमध्ये हमखास असणार अशी ठिकाणं. पण मोठा विकेंड म्हटला कि हि सगळी पर्यटनस्थळं ओसंडून वाहतात आणि आयत्या वेळी अशा ठिकाणी जाणं शक्यच नसतं. मग एखाद्या अनवट ठिकाणाचा शोध घ्यावासा वाटतो. असं अनवट ठिकाण एकदा आम्हाला आमच्या एका मित्राने सुचवलं. "दागशाई " मला तर ऐकूनही हे ठिकाण माहीत नव्हतं . मित्र आणि गुगल ह्यांच्या मदतीने हे कळलं कि दिल्ली शिमला रस्त्यावर शिमल्याच्या आधी साधारण ६०/६५ किमी अंतरावर हे ठिकाण आहे. हि जुन्या कॅंटोन्मेंट पैकी एक कॅंटोन्मेंट आहे.

दिल्लीवरून गाडी चालवत दागशाई ला जायचं आम्ही ठरवलं. साधारण सहा तासात होऊ शकणारा प्रवास. चंडीगढ ओलांडलं कि हिमाचल प्रदेशाचं मृदू सौंदर्य दिसायला लागतं . दिल्लीपासून चंदिगढ पर्यंत डोंगर नावाला सुद्धा दिसत नाही. पण एकदा का चंदिगढ ओलांडलं कि सर्वबाजूनी डोंगर आणि वळणा वळणाचे रस्ते सुरु होतात. आम्ही निघालो तेव्हा दिल्लीत नेहेमीप्रमाणे प्रचंड उकाडा होता पण प्रवासात चंदिगढ च्या पुढे पावसाला सुरुवात झाली. आकाशातले काळे ढग,आजूबाजूचे हिरवे कंच डोंगर, डोंगरातून धावत निघालेला रस्ता असा प्रवास छान सुरु होता. सोलन च्या पुढे साधारण दहा बारा किमी वर दागशाई येतं . ह्या कॅंटोन्मेंट मध्ये जाण्यासाठी घ्यायचं वळण हमखास चुकू शकेल असं . आणि ते जर चुकलं तर बरंच पुढे जाण्याशिवाय पर्याय नसतो. आमच्या मित्राने हे सगळे महत्वाचे सल्ले आम्हाला दिलेले असल्याने आम्ही बरोबर दागशाई चं वळण घेऊन एक प्रचंड चढ कारने चढून कॅंटोन्मेंट परिसरात पोचलो. अगदीच छोटीशी कॅंटोन्मेंट. कॅंटोन्मेंट बोर्ड च्या एका बंगल्यात आमची राहायची व्यवस्था होती, बाजूलाच कॅंटोन्मेंट च्या सीईओ चं टुमदार ऑफिस पण होतं. पावसाचा जोर आता कमी झाला होता परिणामी माकडांची मोठी टोळी खेळायला बंगल्याच्या आवारात यायला बघत होती. माझ्या मुली आणि मी घाबरत घाबरत बंगल्यापाशी पोचलो. बंगल्याची रचना मजेशीर होती. आत शिरल्यावर एक रूम , त्याच्या बाजूला एक जेवायची रुम आणि त्याला लागून स्वयंपाकघर, त्या स्वयंपाक घराला आणखी एक दरवाजा परस्पर बाहेर जाता येईल असा, जेवणाच्या खोलीच्या पुढे एक बैठकीची खोली आणि त्याच्या पुढे दोन तीन पायऱ्या आणखी एका बेडरूम मध्ये उतरत होत्या. थोडक्यात काय तर सगळ्या खोल्या साधारण सरळ रेषेतल्या, वर उतरतं कौलारू छप्पर, बंगल्याच्या रचनेवर,तिथल्या फर्निचरवर ब्रिटिश प्रभाव जाणवावा इतपत. दुपारचं जेवण आटोपून थोडी विश्रांती घेऊन आम्ही फिरायला बाहेर पडलो.




देशातल्या मोस्ट हॉंटेड जागांमध्ये दागशाई चा समावेश आहे हे आम्हाला वाचून माहीत होतं . त्यामुळे इथली सेमेटरी , प्रसिद्ध तुरुंग पाहण्याबद्दल मनात उत्सुकता होतीच. एरवी असते तशी इथे पर्यटकांची गर्दी सुद्धा नव्हती. दागशाई हे नाव कसं पडलं ह्या जागेला त्याची कथा आहे. मुघलांच्या काळात मृत्युदंड ठोठावलेल्या कैद्यांना म्हणे ह्या परिसरात पाठवायचे. इथे पाठवताना त्यांच्या कपाळावर निशाणी केली जायची, दाग - ए - शाही . त्याच नाव मग दागशाई असं रूढ झालं . आमच्या बंगल्याच्या अगदी जवळ तुरुंग होता. ह्या तुरुंगाचं एक वैशिष्ट्य असं कि नथुराम गोडसे ह्यांना ह्या तुरुंगात ठेवलं होतं काही दिवस. तुरुंगाचे फ्लोअरिंग लाकडाचं होतं . तिथल्या अत्यंत अरुंद आणि अंधाऱ्या कोठड्या पाहून अस्वस्थ व्हायला झालं. जेमेतेम उभं राहता येईल एवढीच जागा. ह्या अशा जागेत तासन्तास आणि दिवसानुदिवस राहायची वेळ ज्यांच्यावर आली असेल त्यांची दया येतेच पण अशी क्रूर शिक्षा एक माणूस दुसऱ्या माणसाला देऊ शकतो ह्या विचारानेही अस्वस्थ व्हायला होतं . ह्याच तुरुंगातल्या अंधार कोठड्या घुसमटवून टाकणाऱ्या होत्या. असं म्हणतात कि नथुराम गोडसे हे ह्या जेलमधले शेवटचे कैदी. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षांनी ह्या तुरुंगाचे रूपांतर म्युझियम मध्ये करण्यात आलं. महात्मा गांधी ह्या तुरुंगात दोन दिवस राहिले होते,कैदी म्हणून नाही. ते इथे आयरिश कैद्यांना भेटायला आले होते. आता जरी हि वस्तू म्युझियम असली तरी कोणे एके काळी हा तुरुंग होता, इथे अनेक कैद्यांनी अनेक प्रकारच्या यातना सहन केल्या असणार, आशा निराशेची आंदोलनं ह्या कैद्यांनी अनुभवली असणार, तुरुंगाच्या अधिकाऱ्यांच्या क्रौर्याच्या इथल्या भिंती साक्ष असणार. त्यामुळे का माहित नाही पण इथल्या वातावरणात उदासपणा आणि अस्वस्थता पसरल्यासारखी वाटली.




तिथून आम्ही बाहेर पडलो तोवर पाऊस भुरभुरायला लागलेला, तरी आम्ही नेटाने सेमेटरी कडे निघालो. ह्या स्मशानात मेरी नावाच्या ब्रिटिश बाईचं भूत तिला पुरलं तिथे वावरत असा समज आहे. मेजर जॉर्ज वॅटसन आणि त्याची पत्नी मेरी दागशाई मध्ये राहात होते. त्यांना मुलबाळ नव्हतं . कोणातरी संताच्या आशीर्वादाने मेरी ला दिवस राहिले. पण दुर्दैवाने आठव्या महिन्यात मेरीचा आणि पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला. मेरीची कबर बांधण्यासाठी मार्बल इंग्लंड वरून मागवला होता म्हणे. कालांतराने असा समज पसरला कि ह्या कबरीच्या मार्बलचा तुकडा प्रेग्नन्ट बाईने घेतला तर तिला मुलगा होतो. परिणामी मोठ्या प्रमाणावर इथे येऊन लोक मार्बलचे तुकडे घेऊ लागले. . आपल्या कबरीचं रक्षण करण्यासाठी मेरी इथे वावरायची म्हणे. आम्ही पोचलो तेव्हा सेमेटरी चं प्रवेशदार बंदच होतं. तिथला बोर्ड वाचला, तिथून दिसणारी गर्द हिरवाई पाहिली आणि आम्ही कॅथेड्रल पाहायला निघालो. तुरुंगात वाटली तशी अस्वस्थता ह्या सेमेटरी मध्ये वाटली नाही. सेमेटरी असूनही अस्वस्थता वाटली नाही हे विशेषच. मृत्यू हेच मानवी आयुष्याचं अंतिम सत्य आहे ह्याची जाणीव सर्वानाच मनामध्ये असते म्हणूनही असेल कदाचित. एव्हाना पावसाने पुन्हा जोर धरला होता. संध्याकाळ व्हायला लागलेली. आम्ही आमच्या बंगल्यामध्ये परत जायचं ठरवलं. बंगल्याच्या आवारातही चांगलाच अंधार होता. वीज नाही कि काय अशी शंका लगेच आमच्या मनात आल्याशिवाय राहिली नाही. पण वीज होती. बाकी फार काही करण्यासारखं नसल्याने जेवून झोपलोच लवकर. पहाटेकडे माकडांनी छपरावर मारलेल्या उड्यांमुळे जाग आली. बंगल्याच्या आवारात बसून समोरचे हिरवेगार डोंगर पाहायला मजा येत होती. दिल्ली मुंबई सारख्या शहरात नसणारी प्रसन्न शांतता होती. दागशाई मध्ये भुतं आहेत का नाही माहीत नाही. पण दागशाई सुंदर, शांत आणि टुमदार आहे ह्यात शंका नाही. नेहेमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी भेट द्यायची इच्छा असणाऱ्या पर्यटकांनी जरूर जावं अशी जागा आहे हि.

खूपच छान, नावीन्यपूर्ण माहिती
ReplyDelete