कामानिमित्ताने भोपाळ ला काही वेळा जाणं झालं होतं माझं . त्यामुळे भोपाळ मधली प्रेक्षणीय स्थळं , त्याच्या जवळचं सांची आणि भीमबेटका हे बघून झालं होतं . त्यामुळे ह्यावेळी मी भोपाळला गेले तेव्हा हातात अर्धा दिवस रिकामा होता तेव्हा काय करावं असा प्रश्न मनात होता. अचानक कोणीतरी म्हटलं, " तुम्हाला जंगलात फिरायची आवड आहे आणि हातात मर्यादित वेळ आहे तर तुम्ही रातापानी व्याघ्रप्रकल्पाला जाऊन येऊ शकता. जंगल म्हटल्यावर माझा उत्साह वाढला. मी लगेचच गुगल इत्यादी माध्यमातून माहिती मिळवली. मध्य प्रदेश सरकारच्या जंगल सफारी बुकिंगच्या संकेतस्थळावरून सफारी बुकिंग केलं . भोपळवरून रातापानीला पोचायला साधारण पाऊण तास लागतो. भोपाळ शहरातून बाहेर पडलं कि सरळसोट रस्ता आहे . आम्हाला भोपाळमधून निघायला थोडा उशीर झाला, उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लवकरच उजाडलेलं होतं . आम्ही जिप्सीमध्ये बसून व्याघ्रप्रकल्पात प्रवेश केला. हा प्रकल्प तुलनेने नवीन असल्यामुळे इथे पर्यटकांचा वावर मर्यादित आहे. त्यात आम्हाला उशीर झालेला असल्याने आसपास एकही जिप्सी नव्हती. जंगल बऱ्यापैकी सुकलेलं होतं . त्यामुळे आम्हाला वन्यप्राणी चटकन दिसतील अशी आशा होती. आमच्याबरोबरच्या वन विभागाच्या माणसाला जंगलाची चांगली माहिती होती. त्यामुळे प्राणी दिसत नसले तरी जंगलाबद्दल छान माहिती मिळत होती. अर्ध्या पाऊण तासाच्या जिप्सी प्रवासानंतर एका ठिकाणी जिप्सी थांबली. बरोबरच्या वन विभागाच्या माणसाने आम्हाला खाली उतरायला सांगितलं. मला जरा आश्चर्यच वाटलं. जंगलात उतरण्यासाठी जागा ठरलेल्या असतात. तिथे साधारणपणे स्वच्छतागृह इत्यादी सोय असते. पण इथे तसं काहीच दिसत नव्हतं.
आम्ही जिप्सीमधून खाली उतरलो आणि वन खात्याच्या माणसामागून एक चढ चढायला लागलो. मला तर काळातच नव्हतं कि कुठे चाललो आहोत. पण आपण कुठे आणि कशासाठी चाललो आहोत हा प्रश्न मी त्याला विचारला नाही. दोनेक मिनिटात आम्ही चढून थोड्याशा सपाट जागेवर पोचलो. एका मोठ्या दगडाचा काही भाग तुटून हा सपाट भाग तयार झाला असावा असं वाटलं. चढून वर पोचलो आणि त्या मोठ्या दगडाकडे त्या माणसाने बोट दाखवलं. त्या दगडावर चित्र होती. हजारो वर्षांपूर्वीच्या माणसांनी काढलेली रंगीत रेखाचित्र होती. क्षणभर मला काही कळेचना. जंगलात वन्यप्राणी बघायला आलेल्या माझ्या समोर माझ्याच हजारो वर्षांपूर्वीच्या पूर्वजांनी काढलेली रेखाचित्र होती. त्या रेखाचित्रांकडे मी मंत्रमुग्ध होऊन पाहायला लागले. एक मोठा गेंडा किंवा बैलासारखा प्राणी होता. त्याचं एक बाकदार शिंग, आखूड शेपटी, चित्रात अधूनमधून आपल्या वारली पेंटिंगमध्ये असतात तशा माणसांच्या रेखाकृती. त्यात एका माणसाच्या हातात धनुष्य बाणासारखं काहीतरी दिसत होतं . चित्राच्या दुसऱ्या भागात एक चौकोनी चिन्हासारखं काहीतरी होती, हरिणांची रांग होती. काही चित्रकृती स्पष्ट होत्या , काही काळाच्या ओघात अस्पष्ट झाल्या होत्या. इतिहासासारख्याच . काही गोष्टी लख्खपणे माहीत झालेल्या , काही गोष्टी अजूनही धूसर असणाऱ्या. भीमबेटकाची जगप्रसिद्ध चित्र मी काही वर्षांपूर्वी पहिली होती. हे चित्र पाहिल्यावर मला अचानक लक्षात आलं कि भीमबेटका हे रातापानी जंगलाचाच भाग आहे. ह्यावेळी मी रातापानी चं जंगल पाहायला आलेले आणि अचानक हि चित्र भेटली.
काही वर्षांपूर्वी पाहिलेली भीमबेटका मधली रेखाचित्र आणि हि चित्र हि समकालीनच असणार. पण हजारो वर्षांपूर्वी माणसांनी हे अंतर कसं कापलं असेल? किंवा तिथली चित्र आणि इथली चित्र काढणारी माणसं वेगळीच असतील का? एवढ्या हजारो वर्षांपूर्वी ती चित्र काढणाऱ्या माणसांना वाटलं तरी असेल का कि हजारो वर्षानंतर त्यांचेच कोणीतरी वंशज आश्चर्याने हि चित्र पाहतील? मुळात कोणी पाहावी म्हणून हि चित्र त्या माणसांनी काढली असतील का? कि वेळ घालवण्याचं साधन, विरंगुळा, स्वतःला व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून हि चित्र काढली असतील? ह्या चित्रांमधल्या मानवी आकृतींमध्ये पुरुष आणि स्त्री असा भेद काही स्पष्ट जाणवत नव्हता. म्हणजे त्या काळात स्त्री आणि पुरुष असा भेद फारसा नव्हताच कि काय? अशीही एक शंका माझ्या मनात येऊन गेली. हजारो वर्षांपूर्वीच्या माणसांमध्ये आणि माझ्यामध्ये त्या भिंतीवरची ती स्पष्ट अस्पष्ट रेखाचित्र हा एक दुवा होता. तेव्हापासूनच माणसं चित्र काढत होती. आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टी रेखाचित्रांमधून मांडत होती. हि चित्र एकाच व्यक्तीने काढली असतील कि अनेकांनी काढली असतील? ती काढल्यावर त्यांनी ती एकमेकांना उत्साहाने दाखवली असतील का? आज आम्हाला चढून जाऊन हि रेखाचित्र पाहावी लागली, हजारो वर्षांपूर्वी इतक्या वर ते लोक का आले असतील? आणि ह्या उंच दगडावर चित्र काढण्यासाठी तेवढी उंची होती का त्यांची? त्यावेळच्या माणसांची भाषा कशी होती? ते एकमेकांशी कसा संवाद साधत असतील? ह्या चित्रातली काही चिन्ह हि भाषिक चिन्ह असतील का? दगडावरच्या त्या चित्रांकडे मंत्रमौग्ध होऊन पाहत असतानाच हे सगळे प्रश्नही डोक्यात घोंगावत होते. त्यातल्या बहुतेक प्रश्नांची एकदम बरोबर उत्तरं नव्हतीच मिळणार. अंदाजच बांधायचे त्या चित्रांबद्दल. पण हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाशी आपल्याला जोडण्याची विलक्षण ताकद त्या चित्रांमध्ये होती . जीवनाच्या सातत्याचा तो एक रेखीव पुरावाच म्हणायचं.







सुंदर!
ReplyDeleteछान अनुभव कथन
ReplyDeleteमस्त!! हुरहुरल्यासारखं झालं मनात वाचताना.
ReplyDeleteआश्चर्य आहे; एवढी जुनी दगडावर काढलेली चित्रं अजूनही चांगल्या आवस्थेत आहेत. माहिती नसलेल्या या गोष्टी माहिती झाल्या. छान लिहिले आहे
ReplyDeleteछान मांडले आहे, मॅडम
ReplyDeleteखूप नावीन्यपूर्ण माहिती मिळाली. विलोभनीय सफारी
ReplyDeleteMast
ReplyDeleteफारच छान माहिती दिलीस सुप्रिया, ही रेखाचित्रे इतकी वर्ष झाली ऊन पाऊस वाऱ्यात अजूनही चांगली आहेत हे कौतुकास्पद आहे.
ReplyDelete