२००२ मध्ये मी मध्य प्रदेशात पंचमढीला गेले होते. मध्य प्रदेश टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन च्या "अमलताश " नावाच्या छोटेखानी हॉटेल मध्ये आम्ही राहिलो होतो. "अमलताश हे नाव ऐकायला फारच छान होतं . पण तेव्हा अमलताश म्हणजे नक्की काय हे माहीतच नव्हतं. हिंदी भाषक प्रदेशाशी तेव्हा माझा संबंध कमीच होता. अमलताश म्हणजे काय हे विचारल्यावर कळलं कि हे उन्हाळ्यात पिवळी जर्द फुलं येणारं झाड आहे. २००२ मध्ये गुगल ची सोय नव्हती. कि पटकन टाईप करावं आणि विचारावं, अमलताश ला मराठीत काय म्हणतात. पण त्या हॉटेलच्या परिसरात एक अमलताश झाड आहे अशी माहिती तिथल्या माणसाने दिली. पिवळ्या फुलांनी लगडलेलं ते झाड पाहिल्यावर लक्षात आलं कि हा तर मराठीतला बहावा.

नवी दिल्लीत जवळपास सर्वच महत्वाच्या रस्त्यांवर बहावा फुललेला पाहायला मिळतो . मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अमलताश फुलायला लागतो. त्याची पिवळी जर्द फुलं आणि पोपटी हिरवी पानं हि रंगसंगती दिल्लीच्या कडक उन्हाळ्यात मनाला शांती देणारी. इंडिया गेट च्या भव्य परिसरात अमलताश च्या फुलांचे पिवळे जर्द लोलक डुलताना पाहायला खूप मजा येते. इंडिया गेटमधून निघणारा एक रस्ता म्हणजे झाकीर हुसेन मार्ग, ह्या रस्त्यावरून उजव्या बाजूला सुब्रमणिया भारती मार्गावर तर अमलताश ची रांगच लागलेली आहे. त्याच्या फुलांचा सडा रस्त्याच्या डाव्या बाजूला उन्हाळ्याच्या दिवसात दिसत राहतो. चाणक्य पुरी हा दिल्लीतला डिप्लोमॅटिक एरिया. इथे अनेक देशांचे दूतावास आहेत. ह्या परिसरात मुळात परदेशात आढळणारी काही झाडं सुद्धा हमखास दिसतात. ह्या परिसरातही अधूनमधून अमलताश चा मनमोहक फुलोरा दिसत राहतो.


दिल्लीतल्या झाडांबद्दल प्रदीप कृष्ण ह्यांनी " ट्रीज ऑफ दिल्ली " नावाचं पुस्तक लिहिलं आहे. ह्या पुस्तकात अर्थातच अमलताश बद्दल माहिती आहे. अमलताश ची फळं टणक असतात. त्यामुळे ह्या झाडाच्या बियांचा प्रसार होऊन त्यांची संख्या वाढवण्यात कोल्हा , अस्वल ह्या प्राण्यांची मोठी भूमिका असते. कोल्ह्यांना ह्या फळातला रस आवडतो.

अमलताश चे काही फायदे मला भोपाळ जवळच्या रातापानी ह्या व्याघ्र प्रकल्पात सफारी करताना ऐकायला मिळाले. रातापानी च्या जंगलात खूप अमलताश बघायला मिळाले. माझ्या बरोबर आलेल्या फॉरेस्ट गार्ड ने मला सांगितलं कि मध्य प्रांतातले आदिवासी अमलताश ची फुलं खातात . वर्षातून एकदा तरी अमलताश च्या फुलांची भाजी खाल्लीच जाते ह्याचा पोट साफ राहण्यासाठी उपयोग होतो. अमलताश च्या शेंगेबद्दल एक गमतीशीर गोष्ट त्याने मला सांगितली. अमलताश ची जी शेंग असते ती गादी किंवा अंथरुणाखाली ठेवली तर ढेकूण होत नाहीत. रातापानी च्या सुकलेल्या जंगलात कडक उन्हाळ्यात अधूनमधून फुललेले अमलताश पाहून डोळ्यांना खूपच आराम मिळत होता. एके ठिकाणी अमलताश च्या फुलांचा फोटो काढायला आम्ही जिप्सी थांबवायला सांगितली तर त्या फॉरेस्ट गार्ड ने अमलताशच्या फुलांचा छानसा झुपका आम्हाला काढून दिला.



अमलताश चा भरलेला दरबार पाहायचा असेल तर मात्र दिल्लीतल्या खान मार्केट जवळच्या अमृता शेरगील मार्गावर उन्हाळ्यात गेलंच पाहिजे. ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं आहेत. आणि त्यातही अमलताश खूप आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात दिल्लीतल्या नकोशा वाटणाऱ्या उन्हाळ्याने तुम्ही त्रासला असाल तर जीवाला शांत करण्यासाठी अमृता शेरगील मार्गावर जरूर जा. अमृता शेरगील ह्या चित्रकार होत्या. त्यांच्या अनेक पेंटिंग्स मध्ये लाल रंगाचा मुक्त वापर दिसतो. त्यांचं नाव असलेल्या ह्या रस्त्यावर उन्हाळ्यात हिरवा आणि पिवळा रंग निसर्गाने उधळलेला असतो . एखाद्या चित्रकाराचं नाव असणारा हा रस्ता चित्रासारखाच सुंदर दिसतो . ह्या रस्त्यावरचं हे मुक्त सौंदर्य पाहूनच ह्या रस्त्याला अमृता शेरगील ह्यांचं नाव दिलं असणार ह्याची खात्री पटते. रात्रीच्या वेळी अमलताश ची पिवळी झुंबरं वाऱ्यावर डुलत राहतात आणि रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशात चमकत राहतात. फुलांचा मंद सुगंध हवेत भरलेला असतो. दिल्लीतला असह्य उन्हाळा सुसह्य करण्याची ताकद अमलताश मध्ये आहे नक्कीच.

खूप छान ! अतिशय संवेदांशीलपणे निसर्गाची ही कीमया तुमच्या लेखणीतून टिपली गेली आहे यांची खात्री करायला वाट पाहता नये. अमलताश नावाचा एक चित्रपट देखील अलीकडे होऊन गेला. ही फुले नक्कीच जादुई आहेत. अमृता शेरगिल मार्गावर मी पण ह्यांची पिवळाई पाहून सुखावतो. यांना पाहूनच मी पाचेक वर्षांपूर्वी काही लिहिले होते ते मांडतो.
ReplyDeleteपत्तो का तूटना तय है
पेडोंका झूकना तय है
मनचाही राह चल ए गालिब
तेरा मुझसे मिलना तय है
https://x.com/amitbhole/status/1271878336332038145?s=46&t=Zff-5IMNcPVx2eWYQu6DMw
@amitbhole
धन्यवाद अमित
Deleteव्वा...अमलताश म्हणजेच आपल्या बहावा. खूप छान सविस्तर परिचय झाला.
ReplyDeleteधन्यवाद नितीन जी
Deleteव्वा...अमलताश म्हणजेच आपला बहावा...दिल्लीत कडकडदूमाच्या बगीच्यात सकाळच्या फेरी दरम्यान छान भेट व्हायची.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteVery informative - Thank you. Now I would watch the movie Amaltash and see the correlation.
ReplyDeleteThank you
Deleteबहावा वृक्षाबद्दलचा ललित लेख छान जमलाय. कोल्ह्याची आवड, ढेकूण पळवण्यासाठी युक्ती, पोट साफ होणं आणि फुलांची भाजी हे संदर्भ नव्यानं समजले. मस्त लेख.
ReplyDeleteधन्यवाद गजानन
Deleteमला bahava हे नावच फार सुंदर वाटतं. माझं आजोळ ओगलेवाडी. तिथे काच कारखान्यात बाहावा ची दुतर्फा रांगच होती. झाडं लहान, एका उंचीची आणि भरघोस फुलं. काय अप्रतिम दृश्य, ते सोनेरी दाट घोस. अगदी लहानपणी पऱ्यांच्या राज्यात फिरतोय असच वाटायचं.
ReplyDeleteछान लिहिलयस सुप्रिया. मजा आली वाचताना.
बहावा चे हिंदी भाषेतील अमलताश हे नाव छान आहे. आपण खूप छान लिहिलं आहे. लेखासोबत फोटो खूप छान काढले आहेत त्यामुळे वाचताना बहावा कसा असतो हे लगेच तिथल्या तिथे बघता आलं.
ReplyDelete