इतर कुठच्याही महानगरापेक्षा नवी दिल्लीत झाडांची संख्या जास्त आहे. इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, संसद भवन, पुराना किला , सुंदर नर्सरी,लोदी गार्डन्स,नेहेरु पार्क,हुमायून टोम्ब , सफदरजंग टोम्ब ह्या सगळ्या ठिकाणी असणारी जुनी आणि विविध प्रकारची झाडं म्हणजे नवी दिल्लीतला हिरवा खजिनाच म्हणायला हवा. झाडांचे बरेच प्रकार इथे असल्याने वेगेवेगळ्या ऋतूतली झाडांची बदलती रूपं बघण्याचा आनंद इथे मिळतो. नवी दिल्लीची राजधानी म्हणून आखणी केली ल ल्युटेन्स नावाच्या आर्किटेक्त्त ने, त्यामुळे ह्या परिसराला ल्युटेन्स दिल्ली असंही म्हटलं जात. राजधानीची उभारणी होत असतानाच इथल्या महत्वाच्या रस्त्यांच्या दुतर्फा झाड लावली गेली, ह्यांना ऍव्हेन्यू ट्रीज असंही म्हणतात. एकदा उन्हाळ्यात अशोक रोडवरून जाताना रस्त्याच्या दुतर्फा जांभळं विकणारे लोक दिसले. नंतर लक्षात आलं कि ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जांभळाची बरीच झाडं आहेत. इंडिया गेट मधून हे दहा रस्ते फुटतात त्या प्रत्येक रस्त्यावर विशिष्ट प्रकारची झाडं लावलेली आहेत. अशोक रोडवर जशी जांभळाची झाडं आहेत तशी शाहजहान रस्त्यावर अर्जुन वृक्ष आहेत, पंडारा रोडवर प्रामुख्याने नीम आहे. भर उन्हाळ्यात ह्या रस्त्यावर नीम वृक्षाची पानं गळताना बघायला मजा येते. इंडिया गेट परिसरातही वेगवेगळी झाडं आहेत. पूर्वीचा राजपथ आता कर्तव्य पथ . ह्या कर्तव्य पथाच्या दोन्ही बाजूला जांभळाची बरीच झाडं आहेत. इंडिया गेट च्या सर्कल मध्ये पिंपळ,आंबा,अर्जुन,नीम , गुलमोहोर हि झाड हमखास दिसतात. इथे काही मोठे आणि चांगले जुने वटवृक्षही आहेत. ह्या वटवृक्षानी इंडिया गेट च्या राजस सौंदर्यात भरच पडते. जणू काही हे वृक्ष दिल्लीत घडलेल्या वर्षानुवर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार. असं म्हणतात कि लोदी रोड वरची काही झाडं हि शेरशहा सुरीच्या काळात लावली गेली होती. खरं खोटं मला माहित नाही पण लोदी रोड वर अनेक जुनी झाडं आहेत . जवळच्या लोदी गार्डनमध्येही खूप वेगवेगळी झाडं पाहायला मिळतात.
नवी दिल्लीतला माझा सर्वात आवडता रस्ता म्हणजे अमृता शेरगील मार्ग. खान मार्केटमधून निघणारा आणि लोदी रोडवर पोचणारा अमृता शेरगील मार्ग. अमृता शेरगील ह्या कलाकार बाईंचं नाव सार्थ करणारा हा चित्रवत सुंदर रस्ता . अमृता शेरगील चित्रकार होत्या. २० शतकातल्या महत्वाच्या स्त्री चित्रकार. ह्या रस्त्याच्या दुतर्फा मोठी आणि श्रीमंत मंडळींची घरं आहेत. ह्या घरांची सुंदर लॉन्स किंवा बागेतली झाडं बाहेरच्या रस्त्याकडे उत्सुकतेने पाहत असतात. ह्या रस्त्याच्या दुतर्फा बहाव्याची झाडं आहेत. हिंदीत बहाव्याला अमलताश असं भारदस्त नाव आहे. भर उन्हाळ्यात अमलताश बहरलेला असतो. त्याच्या पिवळ्या जर्द फुलांचा सडा अमृता शेरगील मार्गावर पडलेला असतो. दिल्लीतलं तापमान ४० च्या पुढे गेलेलं असतं , उन्हाळ्याने जीव नकोसा झालेला असतो अशावेळी ह्या बहाव्याच्या सुखद दर्शनाने मन शांत व्हायला वेळ लागत नाही.
अमृता शेरगील मार्गाव्यतिरिक्त दिल्लीत अनेक ठिकाणी अमलताश दिसतो. त्याच्या फुलांचा सोनेरी सडा अनेक ठिकाणी पडलेला दिसतो. ह्या बहाव्याच्या फुलांचे लोलक जागोजागी डुलताना दिसतात. दिल्ली हायकोर्टाच्या जवळ असणाऱ्या सुब्रमणिया भारती मार्गावर,पुढे अकबर रोडवर बरेच अमलताश आहेत, अगदी सप्टेंबर पर्यंत पिवळ्या जर्द फुलांचे लोलक डुलताना दिसतात. एखादी वाऱ्याची झुळूक आली कि त्या मनमोहक हालचाल होते त्याने उन्हाळ्यामुळे झालेली तगमग सुद्धा विसरायला होईल. दिल्लीतली थंडी ओसरायला लागते आणि वसंत ऋतूची चाहूल लागते तेव्हा अनेक ठिकाणी काटेसावर बहरायला लागते. झाडावर एखाद दोन लाल किंवा पिवळी फुलं एखाद्या दिवशी दिसतात आणि मग अचानक सगळं झाड निष्पर्ण झालेलं असतं आणि फांदीफांदीवर फुलं फुललेली दिसतात. ह्याही फुलांचे हळदी कुंकू वाटावं असे लाल पिवळे सडे पडलेले असतात. इंडिया गेट मधल्याअकबर रोड वर वाणिज्य भवन हि इमारत आहे. ह्या वाणिज्य भवनाच्या परिसरात दोन लालभडक काटेसावर आहेत. अकबर रोड आणि मौलाना आझाद रोड च्या जंक्शन वरही एक लाल काटेसावर आहे. वाणिज्य भवनाच्या भोवती चक्कर मारली तर ह्या सगळ्या काटेसावर उठून दिसतात. काटेसावर ला हिंदीत सेमल म्हणतात. संपूर्ण झाडावर एकही पान नाही, फांद्यांचे तपकिरी स्ट्रोक्स आणि त्या स्ट्रोक्सना फुटलेली सुरेख फुलं . चित्रच जणू. उन्हाळ्यात बहाव्या बरोबर फुलणारा गुलमोहोर. लाल,पिवळा गुलमोहोर पण जागोजागी फुललेला असतो. उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणात गुलमोहोर हि जणू तापलेला असतो. दिल्लीत गुलमोहोर पार्क नावाचा परिसर आहे आणि तिथे खरोखरच गुलमोहोराची बरीच झाडं आहेत. उन्हाळ्यात फुलणारं आणखी एक झाड म्हणजे जॅकरांदा. ह्याला हिंदीत निली गुलमोहोर म्हणतात. ह्याची निळसर फुलं लक्ष वेधून घेतात. निळ्या फुलांचं प्रामाण इतर रंगाच्या फुलांपेक्षा कमीच त्यामुळेही हि फुलं लक्ष वेधून घेतात. झाकीर हुसेन मार्गावरच्या घरांपैकी एका घराच्या आवारात हा जॅकरांदा मी पाहिलेला आहे.
मी काही झाडं ,फुलं ह्यांची जाणकार नाही. पण रोज ऑफिसला जाताना, सकाळी चालताना, हिवाळ्यात सुंदर नर्सरी किंवा लोधी गार्डन इथे सहलीला गेल्यावर आजूबाजूची वेगवेगळी झाड दिसतात. त्यांचं निरीक्षण करून काही गोष्टी समजतात. काही गप्पांमधून समजतात. काही वाचनातून समजतात. ह्या झाडांमध्ये होणारे बदल टिपणं हा माझ्या आनंदाचा एक भाग आहे. निसर्गातली व्युत्पत्ती आणि लय हे ह्या झाडांच्या निमित्ताने पाहायला मिळतं . रसरसून फुलणारी फुलं पाहिल्यावर जगण्यातले विविध रंग आठवतात. आज फुललेलं फुल उद्या जमिनीवर पडलेलं पाहिल्यावर आयुष्याची नश्वरता जाणवते. पण जेवढा वेळ ते फुल फुललेलं असतं तेवढा वेळ ते सगळ्यांना आनंद देत असतं हि पण शिकण्यासारखीच गोष्ट. महानगरात राहूनही असा हिरवागार आनंद रोज मिळण्यासारखं भाग्य नाही हेही तितकच खरं .




.jpg)
सुंदर 💚. वसंत फुलला.
ReplyDeleteनेहेमी प्रमाणेच अप्रतिम. डोळ्यांसमोर दिल्लीचे रस्ते आले दुतर्फा उंच उंच वृक्षांनी आखलेले.
ReplyDeleteAbsolutely fantastic write-up...makes me want to visit Delhi and admire the treasure of trees that Delhi is blessed with.
ReplyDelete