
मला अलीकडेच स्वित्झर्लंडला जाण्याची संधी मिळाली होती. एका ट्रेनिंगसाठी मी युनिव्हर्सिटी ऑफ बर्न मध्ये १५ दिवस होते. भारतातून युरोपला किंवा स्वित्झर्लंडला ज्या सहली जातात त्यात बर्न हे शहर बहुतेक वेळा नसतं. पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठिकाणं म्हणजे झुरिक, जिनिव्हा , उंग फ्राऊ . त्यामुळे सर्वसामान्य पर्यटक बर्न शहरात फारसे दिसले नाहीत . बर्न ही या छोट्याशा देशाची राजकीय राजधानी. बर्न युनिव्हर्सिटीसुद्धा प्रसिद्ध . त्यामुळे इथे जगभरातून आलेले विद्यार्थी खूप दिसतात आणि नोकरदार वर्गही खूप दिसला .
आमची लेक्चर्स युनिव्हर्सिटी परिसरात होती आणि युनिव्हर्सिटी अगदी शहराच्या मध्यभागी आहे असं म्हणायला हरकत नाही. बर्न मेन रेल्वे स्टेशनमधून लिफ्टने ४ लेव्हल चढलं की युनिव्हर्सिटी. या रेल्वे स्टेशनपासून ५ मिनिटांच्या अंतरावर स्वित्झर्लंडच पार्लमेंट. आमची राहण्याची व्यवस्था मात्र उपनगरामध्ये होती असं म्हणता येईल. २० मिनिटांचा ट्रामचा प्रवास किंवा ट्रेनचा ७-८ मिनिटांचा प्रवास करून आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पोचू शकत होतो. या रोजच्या प्रवासामुळे स्वित्झर्लण्डच एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आम्हाला अनुभवता आलं ते म्हणजे इथली प्रभावी सार्वजनिक प्रवास व्यवस्था. इथे बस आणि ट्रॅम एकाच प्रकारच्या ट्रॅकवरून जाताना दिसतात. इथल्या ट्रेनही अतिशय वेगवान आणि आरामदायी आहेत . वेळेच्या बाबतीत तर एकदम अचूक. डिजिटल इंडिकेटरवर जी वेळ दाखवलेली असते त्यावेळेला बस , ट्रॅम किंवा ट्रेन आली नाही असं आम्ही १५ दिवसात एकदाही अनुभवलं नाही. बस आणि ट्रॅम एकाच ट्रॅकवरून जाऊ शकत असल्यामुळे त्यांचे स्टॉप सुद्धा कॉमन असतात. अशा कॉमन स्टॉपवरच्या इंडिकेटरवर बस आहे की ट्रॅम आहे ह्याचं चित्रच दाखवलेलं असतं इतर तपशीलांबरोबर. या स्टॉप वर नकाशा असतो ट्रेनचं किंवा बसचं जाळं दाखवणारा. व्हेंडिंग मशीन असतं ज्यावरून पास रिचार्ज करता येतो. युरोपातल्या इतर देशांप्रमाणेच स्वित्झर्लंडची लोकसंख्या मर्यादित आहे त्यामुळे इथे अनेक गोष्टी ऑटोमेटेड आहेत. मशीनच्या आधारे अनेक गोष्टी करता येतात. कदाचित वापर मर्यादित आहे म्हणून इथली सगळी मशीन व्यवस्थित चालताना दिसतात.


बर्न शहर अशा सुविधांनी सज्ज असलं तरी या शहराचा प्राण आहे इथून शतकानुशतकं वाहणारी आर नदी. स्वित्झर्लंडमधली ही एक महत्वाची नदी आहे . पण बर्न शहरासाठी आर नदी म्हणजे पुणेकरांसाठी शनिवारवाडा किंवा अगदी वैशाली आणि रुपाली . बर्न शहरातले सगळे रस्ते जणू नदीकडे जात असतात. या शहराचं या नदीवरच प्रेम आपल्याला सतत जाणवत राहातं . या नदीचा आनंद इथले लोक कसा घेत असतात हे याची देही याची डोळा पाहिलं पाहिजे. हिवाळ्यात नदी गोठल्यासारखीच असते . या नदीचा खरा उपभोग इथल्या उन्हाळ्यातच घेता येतो. आपल्याकडे जशी नद्यांची दयनीय अवस्था आहे तसं दुर्भाग्य इथल्या कुठच्याच नदीचं नाही . आर नदीचं पाणी स्वच्छ इतकं आहे की अनेक ठिकाणी नदीचा उथळ तळ सहज दिसतो. स्वित्झर्लंड हा डोंगराळ देश आहे त्यामुळे आर नदीसुद्धा दऱ्या डोंगरातून वहाते त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला चांगला वेग आहे. आणि म्हणूनच इथे पोहण्याचा आनंदही आव्हानात्मक आहे. उन्हाळ्यात इथे आबाळ वृद्ध पोहताना दिसतात . नदीवर बर्न शहरातच म्हणे १८ पूल आहेत छोटे मोठे . इथल्या काही छोट्या पुलांवरच्या खांबांवरून सरळ नदीत उड्या टाकणारे शौकीनही खूप दिसले आम्हाला. रोज संध्याकाळी लेक्चर्स संपल्यावर नदीच्या वेगवेगळ्या काठांवर जायचं हा आमचा ठरलेला कार्यक्रम. एकदा फारशी वर्दळ नसणाऱ्या नदी काठावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. एक तरुण जोडपं आलं आणि आम्हाला म्हणालं , आम्ही नदीत पोहून येतोय १५-२० मिनिटात , तुम्ही आमच्या सामानावर लक्ष ठेवाल का? आम्ही अर्थातच हो म्हणालो, ही मंडळी जेव्हा परतली तेव्हा आम्ही गप्पा मारल्या, मी सहज त्यांना विचारलं तुम्ही बर्नचेच का? त्या तरुणाने मला पटकन सांगितलं मी बर्नचा आहे पण माझी मैत्रीण झुरिकवरून आली आहे, तिच्याबरोबर इथे आर नदीत पोहोण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली. मला ऐकून गम्मतच वाटली, या नदीत एकत्र पोहोणे हा इथल्या लोकांच्या रोमँटिसिझमचा भाग होता . ज्यांना पोहायचं नाही त्यांच्यासाठी राफ्टिंगची सुविधा आहे. अगदी पाण्यावर तरंगत राहणारे मोठे फ्लोट किंवा तराफे आहेत. अनेक सुंदऱ्या या तराफ्यांवर आरामात पहुडल्या आहेत आणि त्यांचे मित्र तो तराफा वल्हवत आहेत असं हिंदी चित्रपटांमध्ये शोभेल असं दृश्य रोजच एकदा तरी पाहायला मिळत होतं . नदीच्या काठावर अनेक ठिकाणी बायका, पुरुष कुठचाही संकोच न बाळगता पोहोण्याचे तोकडे कपडे घालून वावरत असतात. बायकांचे असे जेमतेम कपडे आहेत म्हणून कोणी त्यांच्याकडे डोळे फाडून बघताना मला दिसलं नाही . नदीच्याच काठावर आरामात कपडे बदलायचे. ते एका फ्लोटसारख्या पिशवीत भरायचे आणि त्या पिशवी कम फ्लोट बरोबर पोहत निघायचं दुसऱ्या किनाऱ्याला. तिथे पोचल्यावर आपले कपडे आपल्या त्या फ्लोट पिशवीत असतातच. अशा पिशव्या इथे सर्व दुकानांमधून सर्रास मिळतात. त्यावरून हेही लक्षात येतं की नदीत पोहणं ही इथली रोजची आणि अनेक लोकांची एक्टिव्हीटी आहे.

.
नदीच्या काठाकाठाने चालत जाता येईल बरंच अंतर किंवा सायकल चालवत जाता येईल असे छान रस्ते नदीच्या काठावर बांधलेले आहेत. नदीच्या काठावर ठिकठिकाणी रेस्टोरंन्टस आहेत जिथे बसून नदीचा आनंद घेत खाता पिता येतं. एकदा अशा रस्त्यावर आम्ही रमत गमत चालतो होतो आणि अचानक लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. आवाज कुठच्या दिशेने येतोय काही संकटाची परिस्थिती असावी का याचा आम्ही अंदाज घेतोय तोवर काठावरच्या एका बाजूच्या छोट्या पायऱयांवरून एक तिशीच्या आसपासची बाई हसत वर चढताना दिसली, तिच्या हातात एक छोट्या मुलाचा चपलांचा जोडही होता. त्या बाईचा चेहेरा हसरा होता म्हणून नाहीतर तिच्या हातातला चपलांचा जोड आणि मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून मला तर धस्संच झालं होतं क्षणभर. मग तिनेच हसून मला सांगितलं, तिकडे मागे माझ्या मुलाच्या पायातली चप्पल नदीच्या पाण्यात पाय बुडवताना पायातून निसटली. ती त्याची आवडती चप्पल होती म्हणून मी धावत पुढे आले ती चप्पल घ्यायला.
बर्न शहर म्हणजे पूर्णतः आर नदीमय असणारं शहर आहे. इथल्या प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय , मनातला हळवा कोपरा म्हणजे ही नदी. या नदीवर इथली मंडळी जेवढं प्रेम करतात तेवढीच तिची काळजीही घेतात. नदीतल्या पाण्यात चुकूनही कोणीही कुठचाही कचरा टाकताना दिसत नाही. नदीच्या काठावरून जाणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी कचरा टाकण्यासाठी डबे आहेत आणि सगळे लोक त्यातच कचरा टाकतात.
आपल्या देशाला खूप मोठा इतिहास आहे. आपली जगप्रसिद्ध सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या आधाराने वसलेली होती. गंगा,ब्रह्मपुत्रा, नर्मदा, गोदावरी,यमुना , तापी , कावेरी अशा नद्या आणि सप्त सिंधूंची देणगी निसर्गाने आपल्याला दिली होती. आर नदीकडे पहाताना या सगळ्या नद्यांची सध्याची अवस्था आठवून कसंतरीच वाटायचं आपल्याकडे तर नद्यांना धार्मिक महत्वही आहे तरी आपल्याला आपल्या नद्या स्वच्छ आणि सुंदर ठेवता आलेल्या नाहीत. स्वित्झर्लंडमधल्या नदीचं कौतुक करतानाच आपल्या नद्यांची आठवण येऊन वाईटही वाटत होतं आणि अपराधीही. विकासाच्या रेट्यात आपण काय गमावतो आहोत हे आर नदीकडे टाकलेल्या एका नजरेतून सलत राहिलं .
सुंदर लेख! कधी प्रत्यक्ष जाता येईल की नाही, माहीत नाही.पण लिखाण अगदी
ReplyDeleteप्रत्ययकारक आहे. फारच छान. वाचताना मीही आरच्या किनारी फेरफटका करून आले.
Keep writing...
अप्रतिम..घरबसल्या जगभ्रमंती ची अनुभूती मिळाली.
ReplyDeleteVery well written Supriya ..
ReplyDeleteWow... Importance of river and respecting it you have captured so nicely in your words !!! Too Good..
ReplyDeleteKapil