
मी नुकतीच लडाख परिसरात ८ दिवस फिरून आले. यात काय विशेष असं एखाद्याला वाटू शकतं. विशेष काही नसलं तरी एक थोडीशी वेगळी गोष्ट अशी की मी आणि माझ्या मैत्रिणी गेलो होतो ८ दिवस फिरायला. आमचे कोणाचेही कुटुंबीय नव्हते आमच्या बरोबर. आणि आमची मुलंही काही वयाने फार मोठी नाहीत. म्हणजे त्यांच्या शाळा, अभ्यास अशा जबाबदाऱ्या त्यांच्या वडील आणि आजी आजोबांवर सोपवून आम्ही गेलो. ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. जायचा प्लॅन तर मी जोशात केला. जसजसे जायचे दिवस जवळ यायला लागले तसा थोडा जीव वर खाली व्हायला लागला. मुली शाळेच्या बससाठी वेळेवर जातील ना, योग्य दिवशी योग्य युनिफॉर्म घालतील ना, छोटी मुलगी ८दिवस राहील का माझी आठवण ना काढता अशा अनेक चिंता मला सतावत होत्या. पण बरेच पैसे खर्च करून विमानाची तिकीट काढली होती, हॉटेलची बुकिंग झाली होती त्यामुळे मागे फिरणं शक्य नव्हत. माझ्या सार्वत्रिक चिंतेचा भाग म्हणून मी माझ्या ११ वर्षाच्या मुलीला म्हणाले, मी तुमचा ८ दिवसांचा मेनू लिहूनच ठेवू का? माझया मुलीचं उत्तर, " मम्मा, त्यापेक्षा तू जाऊच नकोस " अशा स्पष्ट उत्तराने मला अचानक बळ मिळालं ८ दिवस घरापासून लांब जाण्याचं.

लडाख परिसर पर्यटकांच्या रडारवर येण्याचं मुख्य कारण म्हणजे आमीर खानचा प्रसिद्ध चित्रपट थ्री इडियट्स. या चित्रपटात आपण फुंगसूक वांगडूची निसर्गरम्य परिसरातली आगळी वेगळी शाळा बघितली. पेंगोंग लेकच्या काठावर स्कुटरवरून येऊन आमीर खानच्या गळ्यात पडलेली करीना कपूर बघितली. त्यामुळे गेल्या काही वर्षात खूप पर्यटक इथे यायला लागले आहेत. मी पण त्यातलीच एक पर्यटक. लडाखवर निसर्गाचा वरदहस्त आहे. जिथे नजर जाईल तिथे पर्वतांच्या रांगाच रांगा पसरलेल्या दिसतात. काहींवर बर्फ, काही रिकामेच. आकाशाचा निळा रंग म्हणजे भुलवणारा निळा. चित्रांमधून असतात तशा नेमक्या छटा. प्रत्येक क्षणाला बदलणारे पॅंगॉन्ग लेकचे रंग तर थोड्याच वेळात आपल्याला आपला कॅमेरा बाजूला ठेवायला भाग पाडतात. ही निसर्गाची किमया आपण कितीही प्रयत्न केला तरी पूर्णपणे एखाद्या माध्यमात साठवून ठेवू शकत नाही , ती याची देही याची डोळा बघितली पाहिजे, अनुभवली पाहिजे.
इथलं आयुष्य सोपं नाही. आपण कधीतरी फिरायला म्हणून जातो तर आपल्याला इथली थंडी हवीहवीशी वाटते. पण वर्षाचे सहा महिने जबरदस्त गोठवणारी थंडी , बर्फामुळे रस्ते बंद पडतात, वीज नसते, अन्नधान्य भाजीपाला मिळत नाही. प्यायच्या स्वच्छ पाण्यापासून ते विजेपर्यंत सर्वच गोष्टी कठीण होतात . अशाही परिस्थितीत इथली माणसं एकमेकांना धरून जगत राहातात, तगत रहातात, लढत रहातात. लडाखमधल्या अगदी छोट्याशा गावात जरी तुम्ही गेलात तरी समोरून येणारा माणूस विशेषतः बायका अगदी हसून तुम्हाला , "जुले " म्हणणार. जुले म्हणजे लडाखी भाषेतले नमस्ते. लडाख मधल्या सगळ्या बायका मला फार कामसू आणि तरीही प्रसन्न दिसल्या. सकाळी लवकर जवळच्या गावातून ताज्या भाज्या, फळं घेऊन येणाऱ्या बायका असू देत, लेहच्या स्थानिक मार्केटमध्ये गरमागरम मोमोज किंवा लडाख स्पेशल बटर चहा विकणाऱ्या बाया असू देत चेहेऱ्यावर हसू आहेच. तुमच्याशी प्रेमाने बोलण्याची तयारी आहे. या बायांच्या आणि माझ्या आयुष्यात कितीतरी तफावत होती पण जेव्हा त्या उत्साहाने म्हणायच्या, दीदी ये बटर चाय पिके देखो , गरम मोमोज खाके देखो तेव्हा सगळी अंतर सांधली जायची. त्या उत्साही बायांकडून आम्ही मोमोजची पाककृती सुद्धा शिकून घेतली.
लेहच्या मार्केटमध्ये आम्ही सगळ्यांनी एका बाईकडून जरदाळू (Apricot) घ्यायचे ठरवले. तेव्हाची तिची धावपळ आणि लगबग मनात खूप काही हलवून गेली. एकाचवेळी २०-२५ किलोचा माल विकला जाणार या कल्पनेने तिला आनंद झालाच असणार. पण एवढ्या ८-९ जणींना त्या एप्रिकॉटसाठी बॉक्स हवे होते. आता एवढे बॉक्स एकाचवेळी आणायचे कुठून? तिने पटापट जवळच्या दुकानातून बॉक्स मिळवले,त्यात आमचा माल भरला. तिच्याकडून माझा बॉक्स घेताना माझ्या मनात आलं , वर्षातून किती वेळा तिला असा आनंद मिळत असेल ?

लडाखमधल्या अती उंचावरच्या आणि जेमतेम दोन गाड्या एकावेळी जाऊ शकतील अशा रस्त्यांवरून प्रवास हासुद्धा एकप्रकारचा साहसी अनुभव आहे. ड्राएवरची थोडीशी जरी चूक झाली तर सगळं समाप्त ! एका बाजूला उंचच उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला भोवळ आणणारी दरी अशा रस्त्यांवरून तासनतास गाडी चालवायची हे सोपं काम नक्कीच नाही. या रस्त्यांवरून जाणाऱ्या गाडयांचेही काही ठरलेले प्रोटोकॉल आहेत. रस्ते इतके छोटे आणी दगडधोंड्यानी भरलेले असतात की ड्राएवर लोकांनी एकमेकांशी सहकार्य केलं नाही तर गाडया अडकूनच पडतील तासनतास. एखाद्या अगदीच चिंचोळ्या रस्त्यांवरून दोन्ही गाडया सुखरूप पार पडल्या की दोन्ही ड्राएवर मान डोलावून किंवा हात हलवून एकमेकांना पसंतीची पावती देणार. कधी कधी रस्त्याची कामं चालू असतात. रस्ता सपाट करण्यासाठी रोलर फिरत असतो. त्याचं काम पूर्ण होईपर्यंत त्याच्या दोन्ही बाजूच्या गाडया थांबून रहाणार. अशावेळी मग समस्त ड्राएव्हर मंडळींना १५-२० मिनिटांची उसंत मिळते. मग त्यांच्या एकत्र येऊन शिळोप्याच्या गप्पा. मला उगाचच कुतूहल वाटायचं की ह्या ड्राएव्हर मंडळींच्या गप्पांचे विषय काय असतील. गाडीत बसलेल्या, शहरातून आलेल्या , सर्वस्वी वेगळी जीवनशैली असणाऱ्या माझयासारख्या लोकांच्या आयुष्याबद्दल यांना कुतूहल वाटत असेल का? आम्हाला आमच्या संपूर्ण ट्रीपसाठी मिळालेला ड्राएवर झाकीर हा आमचा प्रवासातला मोठा आधार होता. गाडी तर तो उत्तम चालवायचाच पण त्याला आजूबाजूच्या परिसराची फार चांगली माहिती होती. आमचे घरदार हजारो किलोमीटर मागे सोडून आम्ही काही बायकाच फिरायला आलो होतो. आम्हाला आमच्या सुरक्षेची काळजी जशी होती तशी ट्रिपचा आनंद मनमुराद लुटण्याची पण इच्छा होती. मध्येच कुठेतरी गाडी थांबवून फोटो काढावेत किंवा नुसतंच निसर्गसौंदर्य अनुभवावं असं आम्हाला वाटायचं त्या प्रत्येक वेळी झाकीर न कंटाळता गाडी थांबवणार. आम्ही विचारलं , यहाँ थोडी देर के लिए रुक सकते है ? की त्याचं उत्तर, जरूर रुक सकते है.आपल्या देशात योग्य स्वच्छतागृह मिळणं हे एक आव्हानच आहे. लडाखमधले प्रवास खूप मोठे वाटेवर क्वचितच काही चहा, नाष्ट्याच्या टपऱ्या. एखादा असा स्टॉप चुकला तर बराच वेळ काहीही मिळत नाही. लांबच्या प्रवासात ठराविक वेळानंतर जिथे बऱ्यापैकी स्वच्छतागृह असेल अशाच ठिकाणी गाडी थांबवायची ही शिस्त झाकीरने सगळ्या ट्रीपमध्ये पाळली. त्याची या बाबतीतली संवेदनशीलता आम्हाला फारच भावली. लडाखच्या त्या नितांत सुंदर परिसरात असताना मधूनच मुंबईच्या चुकार आठवणी यायच्या. लडाखमधले ते मुक्त मोकळे दिवस संपवून परत एकदा मुंबईच्या साचेबद्ध आणि घुसमटवणाऱ्या जगात परत जाण्याचा विचारही नको वाटायचा. अशाच एका भावनाविवश क्षणी आम्ही झाकीरला म्हटलं , " आप तो नसीबवाले हो जो इतनी खूबसूरत जगह मे रहते हो " श्रीनगर किंवा मनालीच्या पुढे कधीही न गेलेल्या त्याचं उत्तर होतं , " आप भी आ जाओ यही पे " त्याचं उत्तर अगदी सहज आलेलं होतं. आम्ही काही गहन प्रश्न विचारला आणि त्याने त्याचं विचारपूर्वक उत्तर दिलं असा प्रसंगच नव्हता तो. तरी त्याचं सहज आलेलं उत्तर खूप लोडेड होतं. त्याच्या रौद्र तरीही नितांत सुंदर निसर्गाच्या सानिध्यातल्या आयुष्याचं ते सहज सार होतं. आमच्या सगळ्या जीवनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं होतं. प्रश्नांची उत्तरं सोपी असू शकतात याची हळूच जाणीव करून देणारं होतं. 




Simple and beautiful ..The way you described the beauty and life in Ladakh.
ReplyDelete