माझं ऑफिस दक्षिण मुंबईतल्या बॅलार्ड इस्टेट या परिसरात आहे. अनेक जुन्या दगडी इमारतींनी हा भाग फुललेला आहे. एक दिवस एक मित्र ऑफिसला येणार होते त्यांनी आधीच फोन करून सांगितलं आपण तुझ्या ऑफिसजवळच्या ब्रिटानिया आणि कंपनी या हॉटेलात जाऊ. खरतर हे हॉटेल माझ्या ऑफिसच्या बाजूलाच आहे पण त्याच बाह्य रूप काही विशेष आकर्षक नसल्यामुळे मी कधीच तिथे गेले नव्हते. गेल्यानंतर मात्र बराच मोठा खजिना माझ्या समोर आला. मी अगदी कट्टर शाकाहारी आहे त्यामुळे पारशी खानापिना जिथे आहे तिथे मला काय स्कोप असणार असं वाटणं सहाजिक आहे पण ब्रिटानिया आणि कंपनीने माझी निराशा केली नाही. हजार एक वर्षांपूर्वी पर्शिया मधून आलेला झोरॅष्ट्रियन समाज हा प्रामुख्याने पारशी समाज म्हणून आपण ओळखतो. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय जीवनात या समाजाचं मोठं योगदान आहे. दादाभाई नौरोजी, अदी गोदरेज, टाटा, भाभा, शापूरजी पालनजी अशी अनेक नावं सहज आठवतात. पारशी समाज हा शांतताप्रिय आणि कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा आहे.त्यांची वेगळी संस्कृती अजूनही ते नेटाने जपून आहेत . या हॉटेलच्या बाह्यरूपापासून ते इथल्या वेटर्सपर्यंत आणि हॉटेलातल्या सगळ्या वातावरणापर्यंत प्रत्येक गोष्टीत पारशी छाप जाणवत राहातो.
पारशी समाजाचा साधेपणा या हॉटेलांच्या रूपातही उतरलेला आहे. हे हॉटेल ९४ वर्षांचं आहे. ९४ वर्षात फार काही बदल इथे झाले आहेत असं वाटत नाही. इथल फर्निचर ८०-९० वर्ष जुनं आहे हे बघूनच कळतं. आजकाल हॉटेलांमधल्या टेबलांवर टेबलक्लॉथ सहसा दिसत नाहीत. पण इथे लाल पांढऱ्या चौकडीचा टेबलक्लॉथ सर्व टेबलांवर नीटनेटका पसरलेला असतो. प्रत्येक टेबलावर ग्लासमध्ये टिश्यू पेपरचा एक मोठा मनोरा उभा केलेला असतो. ह्या मनोऱ्यातले पेपर इकडे तिकडे गेलेले, मधलाच टिश्यू पेपर काढल्यामुळे दोन पेपरांमध्ये अवास्तव जागा शिल्लक आहे असं तुम्हाला दिसणार नाही. अनेक मोठ्या हस्ती इथे येऊन गेल्या आहेत, अनेकांनी या हॉटेलविषयी यांच्या मालकांविषयी भरभरून लिहिलेलं आहे पण या सगळ्याचा देखावा हॉटेलात कुठेच दिसत नाही. नाही म्हणायला हॉटेलचे सध्याचे मालक बोमन कोहिनूर केव्हा केव्हा जुने फोटो दाखवतात आपल्याला आपल्या टेबलापाशी येऊन. बोमन कोहिनूर स्वतासुद्धा अनेक वेळा ऑर्डर घेताना दिसतात. नवरोझसारख्या महत्त्वाच्या दिवशी या हॉटेलबाहेर फुलांची साधी पण सुंदर सजावट केलेली असते. पण नवरोज आहे म्हणून काही हे हॉटेल जास्त वेळ चालू असत नाही. दुपारी १२ ते ४ हीच वेळ याही दिवशी. हॉटेलात एक मेझनाईन भाग आहे ज्याला आपण माळा म्हणू शकतो असा. इथे पण जेवायला बसण्याची सोय आहे. टेबल खुर्च्या तशाच नीटनेटक्या मांडलेल्या आहेत. पण खालची जागा पुरत असेल तर उगाचच त्या माळ्यावरचे दिवे,पंखे चालू असलेले तुम्हाला दिसणार नाहीत. इथली क्रोकरीसुद्धा साधी आणि सोयीची आहे. त्याच्यात जरासुद्धा फॅन्सीपणा दिसत नाही. काचेच्या जाड प्लेट्स,बाउल,काचेचेच मोठे ग्लास, काटे, चमचे स्टेनलेस स्टीलचे. भाताचे प्रकार किंवा पोळ्या येतात पसरट प्लेटमधून. बाकी भाज्यांचे प्रकार येतात खोलगट बाऊलमधून. उगाच अनेक प्रकारची भांडी लागतच नाहीत.
ब्रिटानिया हे हॉटेल इथल्या बेरी पुलावसाठी प्रसिद्ध असले तरी खास पारशी असा धानसाकही आवर्जून खायला पाहिजे. इथला बेरी पुलाव शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारात मिळतो. तो पाहुनच डोळे सुखावतात. जीभही सुखावणारच. बोमन कोहिनूर यांची पत्नी बचन हिने या बेरी पुलावाची सुरुवात ब्रिटानियामध्ये केली. या पुलावातल्या बेरी त्यावेळी इराणामधूनच यायच्या. एरवी पुलाव प्रकारांमध्ये असणारा तेलकटपणा या बेरी पुलावात बिलकुलच दिसत नाही. कुठचे कृत्रिम रंगही ह्यात वापरलेले जाणवत नाहीत. धानसाक हीसुद्धा खास पारशी चीज. ब्राऊन रंगाचा भात आणि त्याच्याबरोबर उसळीसारखा पदार्थ.हा साक डाळी आणि भाज्यांचं कॉम्बिनेशन असतो. या भाताचा स्वाद अगदी भुरळ घालणारा असतो.
धान सार्क,बेरी पुलाव हे इथले नेहेमीचे पदार्थ. पण नवरोज जवळ आल्यावर इथे मिळणारा बक्लावा खास असतो. हा बक्लावा इराणवरूनच आलेला असतो. मी उत्साहाने हा बक्लावा खाण्यासाठी गेले ब्रिटानियामध्ये. नेहेमीचा धानसाक,बेरी पुलाव झाल्यावर वेटरला सांगितलं बक्लावा दे. तो म्हणाला एक? मी म्हणाले हो आधी एक दे मग बघू. मग समोर आला तो छानसा लाल रंगाचा चपटा डबा ज्यावर सोनेरी अक्षरात काहीतरी लिहिलं होतं . मला ना कळणाऱ्या भाषेत. मी त्याला डबा उघडून द्यायला सांगितलं. त्याने माझया अज्ञानाबद्दल बिलकुल तुच्छता ना दाखवता मला सांगितलं, हा फ्रीझमधला आहे छान लागणार नाही. मी तरीही हट्टाने म्हणाले, थोडीशी चव बघते. त्या डब्यातल्या त्या छोट्या नीटस कापलेल्या वड्या पाहूनच मन सुखावतं. गुलाबपाण्याचा अगदी मंद वासपण दरवळला लगेचच. मी जेव्हा हॉटेलातून बाहेर निघाले तेव्हा काउंटरवरच्या पारशी बाबाने मला अतिशय प्रेमाने सांगितलं, ह्या बकलावाची मजा तो गरम केल्यावरच येते. एकदा तो गरम केला की त्याचे तूप सुटेल आणि गुलाबपाण्याचा वास येईल मग तो खायला तुला खरी मजा येईल" बक्लावा हा पदार्थ तुर्कस्तान आणि इतर अनेक मध्य आशियाई देशांमधून केला जातो. पण इराणियन बक्लावा या बकलावांपेक्षा थोडा वेगळा असतो. त्यात मुख्यतः बदाम आणि पिस्ते असतात आणि त्यावर गुलाबपाणी शिंपडलेलं असतं. इतर ठिकाणी मिळणाऱ्या बक्लवापेक्षा इराणियन बक्लावा थोडा सुका असतो. घरी पोचल्यावर मी ब्रिटानियामध्ये मिळालेल्या सल्ल्यानुसार बक्लावा गरम करून खाल्ला. आपल्याकडच्या इतर मिठायांसारखा हा बक्लावा रुबाबदार नसला तरी लक्षात राहावा असा आहे. त्याची छोटीशी चौकट आकाराची वडी खाताना साधेपणातल्या सौम्य सौंदर्याची जाणीव करून देते. पारशी समाजाच्या साधेपणाशी नाळ जुळलेला हा बक्लावा लक्षात राहील असा.








Excellent Review. Congrats & Best Wishes for future.
ReplyDeleteWow Nice Experience, and thnx for penning down so nicely....
ReplyDeleteI had Bakalava. It was Turkish....
अप्रतिम नोंद.
ReplyDeleteठीक १४ वर्षं पूर्वी पहिल्यांदा खाल्लेला चीकन धनसाक आठवला
Mam I was there two weeks back.. Nice place! :)
ReplyDelete