मला दोन मुली आहेत. सगळ्या मुलांप्रमाणे त्याही hyperactive आहेत, मस्ती करणाऱ्या आहेत, आम्ही शिस्त लावण्याचे, त्यांना घडवण्याचे वगैरे जे प्रयत्न आमच्या दृष्टीने करत असतो त्याला वेळोवेळी आव्हान देणाऱ्या आहेत. त्यामुळे आमच्या घरात खूप वेळा जुगलबंदी चालू असते. आमच्या जुगलबंदीचा सर्वात खास भाग कुठचा असेल तर आमच्या मुली आम्हाला विचारत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न. त्याची आम्ही दिलेली उत्तरं किंवा आमच्या मुलींनीच शोधून काढलेली उत्तरं. आम्हाला जर उत्तर देता येत नसेल किंवा द्यायच नसेल तर त्यावरच्या आमच्या मुलींच्या प्रतिक्रिया.
त्यांच्या काही प्रश्नांची झलक दाखवते तुम्हाला. वय वर्ष साडेचारच्या डोक्यातून आलेले काही प्रश्न- लहान बाळांना दात का नसतात?ढगांना डोळे असतात का?आपल्याला हाडं का असतात?आपल्याला दोन हात दोन पाय एक नाक द्यायचे हे कोणी ठरवलं ? आजी-आजोबा लहानपणी आजी आजोबाच होते का? तुला बाबा मुलगा कसा सापडला?चिंता म्हणजे काय?दारू म्हणजे काय?झाडावर झोपलेले पक्षी रात्री पडत कसे नाहीत? आपण मोठे होतो असं तुम्ही सांगता पण आपली उंची मोठी मोठी होत का नाही?
तर अशा विविधरंगी विविधढंगी प्रश्नांची उत्तरं द्यायच काम काय सोपं आहे का? बिलकुल नाही. तुम्ही जर म्हणालात की आपल्याला दोन हात दोन पाय हे सगळं देवाने ठरवलं आहे तर लगेच पुढचा प्रश्न येणार, देव कोण असतो?कुठे राहातो?आपल्याला दिसत का नाही? दारू म्हणजे एक प्रकारचं सरबत आहे असं जर तुम्ही म्हणालात तर सरबत्ती होणार, सरबतच आहे तर लहान मुलांना का देत नाहीत?मला चव बघायला देशील का एकदा? आता यावर तुम्ही काय डोकं फोडणार? आमच्या मुलीने मला जेव्हा विचारला ढगांना डोळे असतात का? तेव्हा तो प्रश्नच मला अतिशय अनपेक्षित होता. म्हणून मीच उलट विचारलं तुला का हा प्रश्न पडला? त्यावर उत्तर आलं ते गाणं आहे नाच रे मोरा त्यात आहे ढगांशी वारा झुंजला गं , ढगांना दिसत असल्याशिवाय कसं शक्य आहे हे. आश्चर्यचकित होण्याची परत माझीच वेळ. मला खात्री आहे की यच्चयावत मुलांना कमी जास्त प्रमाणात असे वेगवेगळे प्रश्न पडत असतील. काही मुलं बोलत असतील काही बोलत नसतील. पण मोठ्या माणसांना अपेक्षित नसतील असे प्रश्न अगदी निरागसपणे विचारणं हीच तर छोटं असण्याची मजा आहे. नाहीतर आपले मेंदू ,आपलं मन इतक्या बंधनात गुरफ़टलेलं असतं की आपल्याला वेगळा विचारसुद्धा करवत नाही अनेकवेळा. मुलं कसा मुक्त आणि वेगळा विचार करतात याचेही आम्ही खूप अनुभव घेतो. एकदा कृष्णाची गोष्ट मी मुलीला सांगत होते.मी म्हणाले, गोपिका कृष्णाची तक्रार करायला यशोदेकडे गेल्या. मग मीच विचारलं , सांग पाहू, यशोदा कोण होती?लगेच उत्तर - पोलिस. मला या उत्तरावर हसावं, आपल्या मुलीच्या विचारक्षमतेचं कौतुक करावं काहीच कळेना. पण प्रश्नोत्तरांची आम्हाला सवय असल्यामुळे मी विचारलं तुला का ती पोलीस वाटली? उत्तर- मला माहीत आहे ती कृष्णाची आई आहे पण एवढ्या सगळ्या गोपिका तिच्याकडे तक्रार करायला जातात म्हणजे ती पोलीसपण असणार. युक्तिवाद बिनतोड आहे. यशोदा काय करत असेल असा विचारही आपण करत नाही. आपण आपलं कृष्णाची आई असं म्हणून संपवतो गोष्ट. पण साडेचार वर्षाचं ते मूल विचार करतं आई आहेच पण काहीतरी नोकरी इतर काम करत असणार ती! कोल्हा करकोच्याची गोष्ट आपण लहान मुलांना सांगतो. आमच्या कन्येने एकदा विचारलं , कोल्ह्याने आणि करकोच्याने एकेकदा एकमेकांना खीर दिल्यानंतर ते परत कधी भेटले का आणि तेव्हा त्यांनी एकमेकांना काय दिल खायला!
आपण बोलतो मुलांशी तेव्हा आपण वापरत असलेल्या भाषेचाही मुलं बारकाईने विचार करतात. आपण म्हणतो "सांग पाहू " आम्हाला प्रश्न विचारला गेला , पाहू म्हणजे काय? नुसतं सांग का नाही म्हणत आपण? एकदा आम्ही आजीच्या घरी चाललो होतो. आम्ही बोललो आता येईलच आजीचं घर, उलट प्रश्न येईल म्हणजे? घर कुठे जातच नाही तर येणार असं आपण का म्हणतो?
असे अनेक अपेक्षित अनपेक्षित प्रश्न आपली मुलं आपल्याला विचारत असतात. कधी आपल्याला उत्तरं येतात कधी येत नाहीत. कधी कधी प्रश्नांच्या अतिरेकाचा आपल्याला वैताग येतो ,राग येतो. आपण मग त्या छोट्याशा जीवावर चिडचिड करतो. काय हे सारखे काहीतरी प्रश्न विचारत बसतेस तू , जा अभ्यास कर, जा खेळायला. असं काहीतरी थातुर मातुर बोलून आपण वेळ मारून नेतो. आपल्याला त्यावेळी लक्षातच येत नाही की अगदी आपल्या नकळत आपण एक उत्सुकता मारली आहे. एका मुक्त मनाला संदेश दिलाय की उगाचच वेगळे प्रश्न विचारत बसू नये कारण ते आपल्या आई बाबाना आवडत नाही . पुढच्या वेळी असा उटपटांग प्रश्न कदाचित ते मूल विचारणारच नाही. हळू हळू ते मूल असे वेगळे प्रश्न विचारण बंद करेल, वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची मुलाची क्षमता पण आपण कणाकणाने संपवत जातो. आई वडील म्हणून एका किंवा दोन मुलांचे प्रश्न आपल्याला कंटाळा आणि वैताग आणत असतील तर जिथे ढिगाने मुलं आहेत त्या शाळेत कॉलेजात तर बघायलाच नको . मुलांच्या प्रश्नांची आपल्या परीने आपण उत्तरं दिली, उत्तर येत नसेल तर सरळ मला माहीत नाही असं प्रामाणिकपणे सांगितलं तरी त्या मुलाचं तात्पुरतं समाधान होत. प्रश्न विचारण्यात काही चूक नाही हा मेसेज त्याला मिळतो. सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आई बाबाना माहीत नसतात हाही मेसेज मिळतो. आम्ही हा प्रयोग आमच्या मुलींच्या बाबतीत करतो. जी उत्तरं आम्हाला येतात ती देतो. सारखेच प्रश्न विचारायला लागल्या तर मी सरळ सांगते मला कंटाळा आलाय सारखी उत्तरं द्यायचा. लक्षात ठेव प्रश्न आणि विचार नंतर. काही प्रश्ननांची उत्तरं शाळेत विचार असही मी सांगते कधी कधी. चालतं ते पण मुलांना. मुख्य म्हणजे त्या मुलाचे प्रश्न आपल्याला महत्वाचे वाटतात कारण ते मूल आपल्यासाठी महत्वाचं आहे हा मुलांना जाणारा मेसेज महत्वाचा आहे. मी काही बालसंगोपनाच्या टीप्स द्यायला हे लिहिलं नाही. माझे पालकत्वाचे अनुभव शेअर केलेत. त्यातून मी केलेले विचार शेअर केलेत. कारण आपण प्रत्येकजण पालक म्हणून, व्यक्ती म्हणून वेगळे असलो तरी आपल्या मुलांवर आपलं सारखंच प्रेम आहे, हो ना?
Very true.... Good read...my daughter also keeps on asking, many such types of questions....
ReplyDeleteNice article. Sometimes we get irritated by their queations but it is really important to understand the impact on a child of our behaviour.
ReplyDeleteyes our one nice response makes a big difference to their little world
DeleteVery true. kids keep asking 100 questions but I guess we need to show some patience to keep their curious mind keep going and rather than getting irritated at them , we should show them the right way to get the right answer for their questions.
ReplyDeleteAnother good one! Ability to ask questions is the first step towards development.
ReplyDeleteKhupach sundar 👌must read blog it is with fun aliment and good msg to learn in it just simply loved it... thank you for sharing
ReplyDeleteलेख खूप छान आहे.
ReplyDelete