Tuesday, 20 December 2016

पिंकथॉन


प्रिय मिलिंद सोमण ,
तुला एकदम खुलं पत्रं लिहावं असं मला का वाटलं असा प्रश्न तुलाच काय सगळ्यांनाच पडेल . आणि त्यात काही आश्चर्य नाही. रविवार १८ डिसेंबर पहाटे सव्वापाचला मुंबईतल्या बांद्रा कुर्ला संकुलात ट्रॅफिक जॅम घडवण्याची किमया तुझ्या पिंकथॉनने केली. त्या पहाटे शेकड्याने मुली आणि बायका पिंकथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी बांद्रा कुर्ला संकुलात निघाल्या होत्या. त्या शेकडो स्त्रियांमध्ये मी पण एक होते. रविवारच्या पहाटे उठून एवढ्या सगळ्या बायकांना धावायला प्रवृत्त करायचं ही काही सोपी गोष्ट नाही. मुंबईसारख्या महानगरात तर नाहीच नाही. एका हक्काच्या रविवारकडे नजर ठेवून इथे  सगळेजण रोजचा गाडा हाकत असतात. आम्हा बायकांसाठी तर पुढच्या आठवड्याच्या तयारीसाठी सुद्धा रविवार हवाच असतो. तर अशा रविवारी ३,५ आणि १० अशी वेगवेगळी अंतर धावण्यासाठी अनेक मुली,बायका बांद्रा कुर्ला संकुलात उत्साहाने आल्या होत्या. आम्ही बायका काही कमी नाही पहाटे उठून आलो धावण्यासाठी म्हणून कशातरीच नाही आलो बरं. तुझया पिंकथॉनचे पांढरे गुलाबी टीशर्ट नाहीतर धावण्याचे खास कपडे घालून. बाकी ज्यांच्याकडे फिटनेस बँड, फिटनेस घड्याळं आहेत त्यांना हे आपले गॅजेट्स मिरवण्याची आयतीच संधी मिळाली होती. यातल्या यच्चयावत बायांना मिलिंद सोमणच एवढं कौतुक की चुकून तुझ्याबरोबर फोटोची संधी मिळाली तर म्हणून खास मेकअप सुद्धा करून आल्या होत्या. पहाटे उठून लांबून आली आहे म्हणून एकसुद्धा बाई अव्यवस्थित, अजागळ आलेली नव्हती याच मुख्य श्रेय तुलाच आणि मुख्यतः तुझ्या फिटनेसला. 
१० किमी धावण्याची स्पर्धा सुरु कारण्यासाठी तू समोर येऊन उभा राहिल्याबरोबर पहिल्या रांगेतल्या यच्चयावत बायांच्या काळजाचा ठोकाच चुकला. मला एका अर्थी बरच वाटलं की मी मागच्या रांगेत होते तुझा नुसता आवाजच ऐकू येत होता, माझ्याही काळजाचा ठोका चुकला असता तर धावले कशी असते मी?माझ्या पुढेच धावण्यासाठी सज्ज असलेली एक मैत्रीण चक्क म्हणाली, मिलिंद सोमण दिसला आणि काय पाहिजे ,आता मी नक्की १० किमी धावणार. आम्हा बायकांच्या मनात हा विश्वास निर्माण केल्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद, आजकाल सगळ्या शहरांमधून मॅरेथॉन होत असतात. मॅरेथॉन मध्ये धावण्याचा एक ट्रेंडच झाला आहे हल्ली. पण माझयासारख्या बायांना ह्या नेहेमीच्या मॅरॅथॉनसचा जरा धाकच वाटतो. आम्हाला काही रोज धावण्याची सवय नाही. आम्ही धावतो ट्रेन पकडण्यासाठी,नाहीतर मुलांच्या मागे. नियमित व्यायाम केला पाहिजे हे आम्हाला पटत असल तरी  त्यासाठी वेळ कुठून आणि कसा आणायचा हा मोठाच प्रश्न असतो आमच्यासाठी. पण या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं, परिस्थितीतून धावण्याचा मार्ग काढण्याचं बळ तुझ्या पिंकथॉनने माझयासारख्या अनेकींना दिलं. आमच्यातल्या काही जणी एकट्या आल्या होत्या काही आपल्या मैत्रिणींना सोबत घेऊन आल्या होत्या. धावताना सुद्धा हाच पॅटर्न काही एकट्या काही जोडीने आणि काही तर अगदी घोळक्याने. ३ आणि ५ किमी अंतर धावणाऱ्या तर छानपैकी फोटोबिटो पण काढत होत्या. स्पर्धा संपल्यावर सुद्धा मेडल बरोबर,तुझ्या बरोबर फोटो काढण्याची लगबग होतीच अनेकींची. काही लोक या पिंकेथॉनला नावं ठेवत असतील ही काय बायकांची रेस तिथे सिरीयस धावण्यापेक्षा छान दिसायचं, मिलिंदबरोबर फोटो काढायचे एवढंच असतं. पण मला हे पटत नाही. हि फक्त बायकांची रेस आहेच,का असू नये? धावण्यापेक्षा छान दिसत धावण्याला महत्व देणाऱ्या काही मैत्रिणी असतील म्हणून काय बिघडलं? एवढ्या सगळ्या बायकांना धावायला प्रवृत्त कारण हीच मोठी गोष्ट आहे. ज्या क्षणाला मी १० किमी सलग धावून पूर्ण केले तेव्हा मला काय वाटलं ,माझया अशा अनेक मैत्रिणींना काय वाटलं हे जास्त महत्वाचं आहे. आपण हे करू शकतो हा आम्हाला वाटलेला विश्वास महत्वाचा आहे. धावताना आम्हाला मिळालेला आनंद महत्वाचा आहे. थोड्या वेळासाठी का होईना आम्ही आमचं घर,मुलं,संसार सोडून आमच्या समाधानासाठी ,आमच्या आनंदासाठी धावत होतो हे महत्वाचं आहे.इथून पुढे आम्ही अधून मधून धावत राहिलो तरी आमच्यासाठी खूप आहे. तुझ्यापासून प्रेरणा घेऊन स्वतःच्या फिटनेसकडे थोडं लक्ष आम्ही दिलं तरी आमच्या आयुष्यात खूप फरक पडेल. आम्ही एखाद्या दिवशी १० किमी धावलो म्हणून आमच्या रोजच्या आयुष्यात फार काही फरक पडणार नाहीये,आम्हाला रोज लढाव्या लागणाऱ्या लढाया संपणार नाहीयेत पण या लढाया लढण्यासाठी लागणार निरंतर बळ आम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळत असत. एक दिवस १० किमी धावता आल्यामुळे पुढचे आमचे अनेक दिवस उत्साहाचे,आनंदाचे असणार आहेत आणि याला तू निमित्त झाल्यामुळे हे पत्रं. 

11 comments:

  1. Milind has united Women power for a good cause.You have participated in his movement and boosted morale of all women around.keep it up Supriya.

    ReplyDelete
  2. खूप छान..सगळ्यांच्या वतीने हे पत्र आहे असं वाचता क्षणी जाणवलं. खरोखरच स्वत:च्या आनंदासाठी व fitness साठी प्रत्येकीने काहीतरी करायला हवं. नेहमीच्या रगाड्यातून मोकळे, स्वतंत्र असे फक्त स्वत:चे क्षण जगायलाच हवेत हा आशय भावला. (अश्विनी पाध्ये)

    ReplyDelete
  3. Good blog Supriya. Cause & Confidence Pinkathon ��

    ReplyDelete
  4. Good blog Supriya. Cause & Confidence Pinkathon ��

    ReplyDelete
  5. Khup chhan Supriya. Confidence & cause Pinkathon 👍

    ReplyDelete
  6. आपण हि योगेश सारख्याच धावपट्टू आहात तर, वाचून छान वाटले

    पुरुष प्रधान असणाऱ्या मॅरेथॉन शर्यतीत स्त्रियांची पिंकथॉन शर्यत चालू करून खूपच चांगला पायंडा मिलिंद सोमण यांनी पाडला आहे आणि त्यात भाग घेऊन तुम्हीही या गोष्टीला चांगलाच प्रतिसाद दिलात, तुमचे अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. धावपटू नाही पण धावण्यातला आनंद आता हळूहळू कळायला लागला आहे.पिंकथॉनमुळे अनेकींना हा आनंद मिळतो आहे.

      Delete
  7. एकदम छान .. pinkathaon माहीत होते . पण मिलिंद सोमण चे connection आता उमगले!

    ReplyDelete

अनवट पर्यटन- दागशाई

  एखादा मोठा विकेंड असेल तर फिरायला जाता येईल अशी बरीच पर्यटन स्थळं दिल्लीच्या जवळपास आहेत. शिमला,जयपूर,नैनिताल,मसुरी, ऋषिकेश,लॅन्सडाऊन हि  ...